इराणमध्ये सध्या सामान्य लोकांमध्ये मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. या परिस्थितीवर डोनाल्ड ट्रंप यांनी थेट प्रतिक्रिया देत जगाचे लक्ष वेधले आहे. ट्रंप यांनी इराणमधील घडामोडी बारकाईने पाहत असल्याचे सांगितले असून, तेथील सरकारने नागरिकांवर होणारा कथित अत्याचार तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यांच्या या भूमिकेमुळे इराणमधील आंदोलनांना आंतरराष्ट्रीय स्तरावर अधिक महत्त्व मिळाले आहे. दरम्यान, देशात महागाई प्रचंड वाढली आहे, जीवनावश्यक वस्तू महाग झाल्या आहेत आणि तरुणांना नोकऱ्या मिळत नाहीत. अनेक कुटुंबांचे जगणे कठीण झाले आहे. या सगळ्याचा राग आता थेट सरकारविरोधात व्यक्त होत असून नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. राजधानी तेहरानसह अनेक शहरांमध्ये मोर्चे, निदर्शने आणि घोषणाबाजी सुरू आहे.
हे ही वाचा :
ईराणमध्ये इंटरनेट ब्लॅकआउट सुरूच
जेएनयूतले डाव्यांचे विद्यार्थी आंदोलन की वैचारिक विघटन..?
उबाठाचे निष्ठावान दगडू सकपाळ एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत
पहलगामचा आरोपी कसुरीने उघड केले पाक-लष्कर ए तैयबाचे संबंध
सरकारने या आंदोलनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कडक पावले उचलल्याचा आरोप होत आहे. सुरक्षा दलांनी आंदोलकांवर बळाचा वापर केल्याने काही ठिकाणी हिंसाचार झाला. यात अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर हजारो लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकाने अधिक कडक भूमिका घेतली आहे. डोनाल्ड ट्रंप यांनी इशारा देत म्हटले आहे की, इराण सरकारने जर नागरिकांवरील कारवाई वाढवली, तर अमेरिका केवळ निवेदनांपुरती मर्यादित राहणार नाही. गरज पडल्यास लष्करी हस्तक्षेपाचाही पर्याय खुलेपणाने विचारात घेतला जाऊ शकतो. मर्यादित हवाई हल्ले किंवा इतर सैन्य कारवाईचे पर्याय चर्चेत असल्याचेही संकेत देण्यात आले आहेत.
यावर इराणने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने हस्तक्षेप केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराण सरकारने स्पष्ट केले आहे. या सगळ्या घडामोडींमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर चिंता वाढली असून, अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव संपूर्ण मध्य पूर्वेसह जगावर परिणाम करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
