नगरपालिका, महापालिका या निवडणुकानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितींसाठी मतदान प्रक्रियेचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे आणि सचिव सुरेश काकाणी यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली.
राज्यात ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून ७ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. आयोगाकडून निवडणुकांची घोषणा होताच निवडणूक क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समिती यासाठी निवडणुका होणार आहेत. निवडणुकीची घोषणा करताना निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये निवडणूक होणार आहे. त्यानुसार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, कोल्हापूर, पुणे, सातारा, सांगली, छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव, जिल्ह्यात निवडणुका होत आहेत.
आयुक्त दिनेश वाघमारे म्हणाले की, या निवडणुकीत प्रत्येक मतदारांना दोन मते द्यायची आहेत. एक मत जिल्हा परिषद आणि दुसरे मत पंचायत समितीसाठी द्यायचे आहे. यासाठी अर्ज प्रक्रिया ऑफलाईन असणार आहे. नामनिर्देशन प्रक्रिया महापालिकेसारखीच ऑफलाईन असेल. ज्या जागा राखीव आहेत. त्याठिकाणी जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी आवश्यक आहे. निवडून आल्यावर सहा महिन्यात जातप्रमाणपत्र द्यावं लागेल. नाही दिलं तर त्याची निवड रद्द होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हे ही वाचा..
दहशतवादी संबंधांच्या आरोपावरून पाच ५ सरकारी कर्मचारी निलंबित
रशियन तेल टँकरमधून अटक केलेल्या तीन भारतीयांची सुटका
‘ऑपरेशन सिंदूर’ म्हणजे त्रि-सेवा सहकार्याचे सर्वोत्तम उदाहरण!
बांगलादेशात २८ वर्षीय हिंदू रिक्षा चालकाची हत्या
निवडणुकीसाठी २५,४८२ मतदान केंद्र असतील, ही निवडणूक ईव्हीएमने होणार आहे. २२ हजार कंट्रोल युनिट, १ लाख १० हजार बॅलेट युनिट वापरले जाणार आहेत. मतदान केंद्रात वीज, पिण्याचे पाणी शौचालय असेल. काही पिंक मतदान केंद्र असतील, तर काही आदर्श मतदार केंद्रे देखील असणार आहेत.
निवडणूक कार्यक्रम
- नामनिर्देशन स्वीकारणे- १६ जानेवारी ते २१ जानेवारी
- उमेदवारी अर्जांची छाननी- २२ जानेवारी
- अर्ज माघारीची अंतिम मुदत- २७ जानेवारी
- अंतिम उमेदवार यादी आणि चिन्हवाटप- २७ जानेवारी
- मतदान- ५ फेब्रुवारी
- मतमोजणी- ७ फेब्रुवारी
