अजिंक्य रहाणेचा रणजीला रामराम, मुंबईला मोठा धक्का!

अजिंक्य रहाणेचा रणजीला रामराम, मुंबईला मोठा धक्का!

भारतीय संघाबाहेर असलेला अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे याने रणजी ट्रॉफीच्या सध्याच्या हंगामातून माघार घेतली आहे. त्यामुळे मुंबई संघाकडून उर्वरित रणजी सामने तो खेळणार नाही.

रहाणेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला कळवलं आहे की, वैयक्तिक कारणांमुळे तो रेड-बॉल म्हणजेच रणजी ट्रॉफीच्या सामन्यांसाठी उपलब्ध राहणार नाही. त्यामुळे मुंबई संघ व्यवस्थापनाला लीगच्या दुसऱ्या टप्प्यासाठी नव्या खेळाडूंसह संघनिवड करावी लागणार आहे.

रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईला पुढे हैदराबाद आणि दिल्लीविरुद्ध अत्यंत महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. अशा वेळी रहाणेचा अनुभव संघाला मिळणार नाही, ही मुंबईसाठी मोठी बाब मानली जाते.

२०२५-२६ च्या देशांतर्गत हंगामापूर्वीच रहाणेने मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर शार्दुल ठाकूर याच्याकडे मुंबई संघाची धुरा सोपवण्यात आली.

रहाणेच्या नेतृत्वाखाली मुंबईने २०२३-२४ मध्ये रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं होतं आणि तब्बल सात वर्षांचा दुष्काळ संपवला होता. मात्र मागील हंगामात मुंबईला उपांत्य फेरीत विदर्भकडून पराभव स्वीकारावा लागला.

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत रहाणे दुसऱ्या क्रमांकावर आहे. २००७ ते २०२५ या काळात त्याने ८० सामन्यांत ५७.१८ च्या सरासरीने ६,१४१ धावा केल्या आहेत. या यादीत तो फक्त वसीम जाफर यांच्यामागे आहे. मुंबईसाठी रहाणेच्या नावावर १९ शतके आहेत.

हेही वाचा :

इंदौरमध्ये विराटचा विक्रमाचा डाव?

पीएमसीच्या पोर्टलवर नावांचा गोंधळ!

राज ठाकरेंचा फायदा इतरांना, पण मनसेची झोळी रिकामीच

महानगरपालिका निवडणुकीतील अपयशावर राज ठाकरे काय म्हणाले?

रहाणे केवळ मुंबईचाच नाही, तर भारतीय देशांतर्गत क्रिकेट आणि टीम इंडियाचाही एक मोठा आधारस्तंभ राहिला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती.

जुलै २०२३ नंतर भारतीय संघाबाहेर असलेल्या रहाणेने भारतासाठी ८५ कसोटी सामन्यांत १२ शतके आणि २६ अर्धशतकांसह ५,०७७ धावा केल्या आहेत. वनडेमध्ये ९० सामन्यांत २,९६२ धावा, तर टी-२० मध्ये २० सामन्यांत ३७५ धावा त्याच्या नावावर आहेत.

Exit mobile version