ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर आणलं… आणि आता आसीसीवर राज्य!

ऑस्ट्रेलियाला गुडघ्यावर आणलं… आणि आता आसीसीवर राज्य!

भारतीय महिला क्रिकेट संघाची वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी हिला फेब्रुवारी २०२६ महिन्यासाठी आयसीसीचा ‘विमेन्स प्लेयर ऑफ द मंथ’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तिच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच तिने हा मान पटकावला असून, ऑस्ट्रेलियात भारताच्या ऐतिहासिक मालिकाविजयात दिलेल्या निर्णायक योगदानामुळे तिला हा सन्मान मिळाला.

पुरस्कार मिळाल्यानंतर अरुंधती म्हणाली,
“ICC प्लेयर ऑफ द मंथ मिळणं माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. ऑस्ट्रेलियात टी२० मालिका जिंकण्यात माझं योगदान देता आलं, हे माझ्यासाठी आणखी खास आहे. त्यांच्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला हरवणं सोपं नसतं, त्यामुळे हा क्षण खूप महत्त्वाचा आहे.”

ती पुढे म्हणाली,
“या विजयामुळे आमच्या संघाचा आत्मविश्वास प्रचंड वाढला आहे. इंग्लंड आणि वेल्समध्ये होणाऱ्या आगामी ICC महिला टी२० वर्ल्ड कपसाठी आम्ही सज्ज होत आहोत. आमचा संघ संतुलित आहे आणि या स्पर्धेत आम्ही सर्वांच्या नजरेत असू, असा मला विश्वास आहे.”

भारत-ऑस्ट्रेलिया टी२० मालिकेत अरुंधती रेड्डीने अफलातून कामगिरी करत १०.८७ च्या सरासरीने आणि ७.२५ च्या इकॉनॉमीने एकूण ८ विकेट्स घेतल्या. तिच्या या भेदक गोलंदाजीमुळे भारताने मालिका २-१ अशी जिंकली. विशेष म्हणजे, २०१६ नंतर ऑस्ट्रेलियात भारताचा हा पहिलाच टी२० मालिकाविजय ठरला.

सिडनी येथे झालेल्या पहिल्याच सामन्यात अरुंधतीने २२ धावांत ४ विकेट्स घेत कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली आणि ‘प्लेयर ऑफ द मॅच’चा किताबही पटकावला. त्यानंतर कॅनबेरा येथे ३० धावांत २ विकेट्स, तर अॅडलेडमधील निर्णायक सामन्यात ३५ धावांत २ विकेट्स घेत तिने सातत्य राखलं.

अरुंधती रेड्डीच्या या कामगिरीमुळे भारतीय महिला क्रिकेटला नवा आत्मविश्वास मिळाला असून, आगामी वर्ल्ड कपसाठी हा विजय मोठा बूस्टर ठरत आहे.

Exit mobile version