‘भारतासाठी खेळलो, तेच माझे सर्वात मोठे यश’

‘भारतासाठी खेळलो, तेच माझे सर्वात मोठे यश’

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने राष्ट्रीय संघात पुनरागमन करणे हे आता आपले प्रमुख लक्ष्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. भारतासाठी खेळण्याचे स्वप्न पूर्ण झाल्याने आता स्वतःला काही सिद्ध करण्याची गरज नसून, केवळ क्रिकेटवरील प्रेमामुळेच आपण अजूनही खेळत असल्याचे त्याने सांगितले.

३६ वर्षीय भुवनेश्वरने भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना नोव्हेंबर २०२२ मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत भारतासाठी २१ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८७ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी)च्या पॉडकास्टमध्ये बोलताना भुवनेश्वर म्हणाला, “मी आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेट खेळतो, कारण मला क्रिकेटवर प्रेम आहे. करिअरच्या या टप्प्यावर मी केवळ खेळावरील आवडीमुळे मैदानात उतरतो. भारतासाठी खेळण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता मला आणखी काही मिळवायचे नाही. पुन्हा संधी मिळाली तर नक्कीच आनंद होईल, पण त्यासाठी कोणताही दबाव नाही.”

तो पुढे म्हणाला, “मी देशांतर्गत क्रिकेट, यूपी टी-२० लीग खेळतो. क्रिकेटशी नाळ कायम जोडलेली राहावी यासाठी नियमित खेळतो. त्याचबरोबर शरीर तंदुरुस्त राहावे म्हणून आवश्यक तेवढी विश्रांतीही घेतो.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिल्यानंतरच्या आयुष्याबद्दल बोलताना भुवनेश्वरने आपल्या कुटुंबाचे विशेष आभार मानले. तो म्हणाला, “घरी आम्ही क्रिकेटबद्दल फारशी चर्चा करत नाही. भारतीय संघात पुनरागमन होईल का, निवड का झाली नाही किंवा काय चुकले, यावर कधीच बोलणे होत नाही. त्यामुळे मी मानसिकदृष्ट्या शांत आहे आणि मला कोणताही पश्चात्ताप नाही.”

भुवनेश्वरने बदल हा खेळाचा अविभाज्य भाग असल्याचेही नमूद केले. “प्रत्येक पिढी बदलत असते. हा अनुभव घेणारा मी पहिला खेळाडू नाही आणि शेवटचाही नाही. खेळात हे स्वाभाविक आहे. मी आज जिथे आहे, तिथे समाधानी आणि आनंदी आहे,” असेही त्याने स्पष्ट केले.

Exit mobile version