चल रे यशस्वी, टुणुक टुणुक! २ चेंडूंत ‘भोपळा’!

चल रे यशस्वी, टुणुक टुणुक! २ चेंडूंत ‘भोपळा’!

भारत आणि श्रीलंका क्रिकेट इलेव्हन यांच्यात नोंडेस्क्रिप्ट्स क्रिकेट क्लब मैदानावर तीन दिवसीय वॉर्मअप सामना सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल सपशेल फ्लॉप ठरला. पहिल्या डावात यशस्वीला खातेही उघडता आले नाही. अवघ्या २ चेंडूंत तो बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

श्रीलंका क्रिकेट इलेव्हनने ८ बाद ३६३ धावांवर डाव घोषित केल्यानंतर भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल मैदानात उतरले. यशस्वीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, त्याचा डाव अवघ्या दोन चेंडूंत संपला.

ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर यशस्वीने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू थेट गलीमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. त्यामुळे यशस्वी खाते न उघडताच बाद झाला.

डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांविरुद्ध यशस्वीला अलीकडच्या काळात अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्याच्या कसोटी कारकिर्दीत डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाविरुद्ध तो नवव्यांदा बाद झाला आहे. यापूर्वी मार्को यानसेन आणि मिचेल स्टार्क यांनीही त्याला अडचणीत आणले होते.

यानंतर केएल राहुल आणि देवदत्त पडिक्कल यांनी भारतीय डाव सावरला. पावसामुळे खेळ थांबला तेव्हा दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली होती. पडिक्कल आक्रमक फलंदाजी करताना दिसला, तर राहुलने संयमी आणि अँकरची भूमिका बजावली.

याआधी श्रीलंका क्रिकेट इलेव्हनकडून निशान मदुश्काने ६५ चेंडूंत ६६ धावा, रविंदु रसंथाने ७१ धावा, कर्णधार सोनल दिनुशाने ७१ चेंडूंत ५२ धावा, तर पसिंदु सोरियाबंदराने ३५ धावा केल्या.

भारताच्या वेगवान गोलंदाजांना मात्र प्रभाव पाडता आला नाही. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाला एकही विकेट मिळाली नाही. गुरनूर बरारने १ विकेट घेतली. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि मानव सुथार यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

Exit mobile version