राशिद खानचा फिरकीचा कहर!

आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तानचा ९२ धावांनी दणदणीत विजय

राशिद खानचा फिरकीचा कहर!

अफगाणिस्तानने स्टार फिरकीपटू राशिद खानच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर आयर्लंडचा ९२ धावांनी पराभव केला. ब्रेडी क्रिकेट क्लबमध्ये झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यात राशिद खानने तब्बल ६ बळी घेत आयर्लंडच्या फलंदाजीची अक्षरशः दाणादाण उडवली. या विजयासह अफगाणिस्तानने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता.

पावसामुळे हा सामना ५० ऐवजी ४७ षटकांचा करण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ४७ षटकांत ८ बाद २९९ धावा उभारत आयर्लंडसमोर ३०० धावांचे लक्ष्य ठेवले.

अफगाणिस्तानकडून इब्राहिम जादरानने ९७ चेंडूंत ८ चौकार आणि २ षटकारांसह ८४ धावांची शानदार खेळी केली. त्याच्याशिवाय अटलने ४५, रहमत शाहने ३०, अजमतुल्लाह ओमरजाईने ३३, दरविश रसूलीने १६, तर माजी कर्णधार हशमतुल्लाह शाहिदीने अवघ्या २१ चेंडूंत ३६ धावा ठोकल्या. गुरबाजने ३२ धावा केल्या.

३०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडची सुरुवातच खराब झाली. कर्णधार पॉल स्टर्लिंग अवघ्या ५ धावांवर बाद झाला. त्यानंतर अँड्र्यू बालबर्नी आणि कॅड कारमायकल यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७२ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या ९६ पर्यंत नेली. बालबर्नी ३६ धावांवर बाद झाला.

कारमायकलने मात्र अर्धशतक झळकावत संघर्ष केला. त्याने ६६ चेंडूंत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६२ धावा केल्या. हॅरी टेक्टर ५, तर लॉर्कन टकर २३ धावांवर बाद झाले.

२५.५ षटकांत ५ बाद १५२ धावा अशी स्थिती असताना आयर्लंड विजयाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे दिसत होते. मात्र त्यानंतर राशिद खानच्या फिरकीसमोर आयर्लंडचे फलंदाज ढेपाळले. १९८ धावांवर सहावा गडी बाद झाल्यानंतर आयर्लंडचे शेवटचे पाच फलंदाज अवघ्या २५ चेंडूंत केवळ १० धावा जोडून बाद झाले.

अखेर आयर्लंडचा संपूर्ण संघ ३३.४ षटकांत २०७ धावांवर गारद झाला.

अफगाणिस्तानकडून राशिद खानने ६ बळी घेतले, तर अजमतुल्लाह ओमरजाईने २ आणि फजलहक फारुकीने १ बळी घेतला.

आयर्लंडकडून मार्क अडेअर आणि जय मूंद्राने प्रत्येकी २ बळी घेतले. गेविन, कर्टिस कॅम्फर आणि हॅरी टेक्टर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला.

राशिद खानच्या घातक फिरकीमुळे अफगाणिस्तानने सामन्यावर पूर्ण वर्चस्व गाजवत ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवला.

Exit mobile version