वैभवला संधी मिळावी, पण कोणालाही वगळून नाही!

वैभवला संधी मिळावी, पण कोणालाही वगळून नाही!

भारताचा माजी कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजारा याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यापूर्वी भारतीय संघाच्या फलंदाजी क्रमाबाबत आपले मत व्यक्त केले आहे. वैभव सूर्यवंशीला संधी मिळायला हवी, मात्र त्यासाठी संजू सॅमसनला संघाबाहेर ठेवणे योग्य ठरणार नाही, असे पुजाराने स्पष्ट केले.

‘जिओस्टार’शी बोलताना पुजारा म्हणाला, “भारताने संजू सॅमसनवर विश्वास कायम ठेवला पाहिजे. त्याने टी-20 विश्वचषकात स्वतःला सिद्ध केले आहे. त्याच्यात अफाट गुणवत्ता आहे आणि त्यामुळे तो भारतीय संघाच्या अंतिम अकरामध्ये असायलाच हवा.”

पुजाराने १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या प्रतिभेचेही कौतुक केले. मात्र, त्याला संधी देण्यासाठी भारतीय संघाच्या स्थिर झालेल्या अव्वल फलंदाजांना वगळू नये, असे त्याने सांगितले.

“वैभवला खेळवायचे असेल तर नक्की खेळवा, पण कोणाला वगळून नाही. एखाद्या खेळाडूला विश्रांती देऊन त्याला संधी देता येईल. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा किंवा ईशान किशन यांच्यापैकी कोणालाही बाहेर ठेवू नये. वैभव संधीचा हक्कदार आहे आणि योग्य वेळी त्याला संधी मिळेल,” असे पुजारा म्हणाला.

याचबरोबर पुजाराने भारतीय कर्णधार श्रेयस अय्यरच्या संयमी आणि जबाबदार खेळीचेही कौतुक केले. भारताची अवस्था ६ धावांत २ बाद अशी असताना अय्यरने अभिषेक शर्मासोबत ८२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत संघाला सावरले.

अय्यरने ४७ चेंडूत ६८ धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीबद्दल पुजारा म्हणाला, “संघ संकटात असताना श्रेयसने मोठी परिपक्वता दाखवली. अभिषेकने आक्रमक खेळ केला, तर श्रेयसने दुसरे टोक सांभाळत योग्य वेळेची वाट पाहिली. एकदा तो स्थिरावल्यानंतर त्याने मोठे फटके खेळले. कर्णधार म्हणून आणि फलंदाज म्हणून ही त्याची परिपूर्ण खेळी होती.”

Exit mobile version