रोनाल्डोने अल नासरला बनवलं चॅम्पियन!

रोनाल्डोने अल नासरला बनवलं चॅम्पियन!

फुटबॉलचा सुपरस्टार क्रिस्टियानो रोनाल्डोने पुन्हा एकदा आपल्या खेळाची जादू दाखवत अल नासर क्लबला सौदी प्रो लीग २०२५-२६ चे विजेतेपद मिळवून दिले. गुरुवारी झालेल्या सामन्यात अल नासरने दमैक संघाचा ४-१ असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात रोनाल्डोने तब्बल २ गोल झळकावत संघाच्या विजयात मोठा वाटा उचलला.

जानेवारी २०२३ मध्ये अल नासरमध्ये दाखल झाल्यानंतर रोनाल्डोसाठी हा क्लबसोबतचा पहिलाच मोठा किताब ठरला. अल नासरच्या इतिहासातील हा ११वा लीग किताब आहे.

हंगामातील अखेरच्या सामन्यात अल नासरने प्रतिस्पर्धी अल हिलालपेक्षा २ गुणांनी आघाडी घेत विजेतेपद पटकावले. मागील आठवड्यात गोलकीपर बेंटोच्या स्टॉपेज टाइममधील चुकीमुळे अल नासरला अल हिलालविरुद्ध १-१ अशी बरोबरी मान्य करावी लागली होती आणि त्यामुळे किताबाचे गणित ताणले गेले होते.

मात्र, किंग सऊद युनिव्हर्सिटी स्टेडियमवर जॉर्ज जीसस यांच्या संघाने दमैकविरुद्ध शानदार खेळ करत सर्व शंका दूर केल्या. लिव्हरपूलचा माजी स्टार सादियो मानेनेही अल नासरसाठी गोल केला, तर जोआओ फेलिक्सही रोनाल्डोसह मैदानात उतरला.

पहिल्या हाफच्या अखेरीस सादियो मानेने अल नासरला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱ्या हाफमध्ये किंग्सले कोमनने संघाची आघाडी २-० केली.

यानंतर रंगमंच गाजवला तो रोनाल्डोने!
सामन्याच्या ६०व्या मिनिटाला त्याने शानदार फ्री-किकवर गोल करत चाहत्यांना जल्लोषात बुडवले. त्यानंतर ८१व्या मिनिटाला गोलकीपरला चकवा देत अप्रतिम गोल झळकावला. या हंगामातील रोनाल्डोचे हे २७वे आणि २८वे गोल ठरले.

दमैककडून एकमेव गोल ५८व्या मिनिटाला करण्यात आला. मात्र, अल नासरचा बचावही या सामन्यात भक्कम दिसला.

पाच वेळा ‘बॅलन डी’ऑर’ जिंकलेल्या रोनाल्डोला सामना संपण्याच्या अवघ्या ३ मिनिटांपूर्वी मैदानाबाहेर घेतले गेले. त्यावेळी संपूर्ण स्टेडियम उभे राहून टाळ्यांच्या गजरात त्याचे स्वागत करत होते. तो क्षण अत्यंत भावुक होता.

विशेष म्हणजे, रोनाल्डोने आता पोर्तुगाल, इंग्लंड, स्पेन, इटली आणि सौदी अरेबिया या देशांमध्ये लीग विजेतेपद जिंकण्याची कामगिरी केली आहे. आता तो आगामी फिफा वर्ल्ड कप २०२६ मध्ये पोर्तुगालकडून खेळताना दिसणार असून हा त्याचा सहावा विश्वचषक असेल.

Exit mobile version