फीफा वर्ल्ड कप २०२६ साठी ब्राझील संघात नेमारची पुनरागमन

फीफा वर्ल्ड कप २०२६ साठी ब्राझील संघात नेमारची पुनरागमन

फुटबॉल विश्वासाठी मोठी बातमी समोर आली असून ब्राझीलचा स्टार फुटबॉलपटू नेमार याची फीफा वर्ल्ड कप 2026 साठी ब्राझीलच्या राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली आहे. तब्बल अडीच वर्षांनंतर नेमार पुन्हा एकदा ब्राझीलच्या पिवळ्या जर्सीत दिसणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.

ब्राझीलचे नवे प्रशिक्षक कार्लो अँसेलोटी यांनी रिओ डी जानेरो येथे पत्रकार परिषद घेत संघाची घोषणा केली. विशेष म्हणजे, नेमारच्या नावाची घोषणा त्यांनी सर्वात शेवटी केली. त्यामुळे गेल्या काही आठवड्यांपासून ब्राझीलच्या माध्यमांमध्ये सुरू असलेल्या चर्चांना आणि अंदाजांना अखेर पूर्णविराम मिळाला.

“नेमार फक्त स्टार नाही, तो संघात जीव आणतो”

संघ निवडीबाबत बोलताना अँसेलोटी म्हणाले,
“आम्ही नेमारची निवड केवळ एक पर्यायी खेळाडू म्हणून केलेली नाही. त्याच्याकडे असा अनुभव आणि गुणवत्ता आहे, ज्यामुळे तो संपूर्ण संघात नवी ऊर्जा निर्माण करू शकतो. तो मैदानावर 1 मिनिट खेळो किंवा पूर्ण 90 मिनिटे, त्याचा प्रभाव संघासाठी महत्त्वाचा असतो.”

ते पुढे म्हणाले,
“संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडूला मेहनत करावी लागेल. नेमारलाही त्याच निकषांवर संधी दिली जाईल. फिटनेस आणि ट्रेनिंगमध्ये तो स्वतःला सिद्ध करेल, तेव्हाच त्याला मैदानात उतरवले जाईल.”

दुखापतीमुळे दीर्घ काळ मैदानाबाहेर

34 वर्षीय नेमारने ब्राझीलसाठी आतापर्यंत १२८ आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 79 गोल केले आहेत. ब्राझीलच्या इतिहासात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू म्हणून त्याची नोंद आहे.

नेमारने ब्राझीलकडून शेवटचा सामना २०२३ मध्ये उरुग्वेविरुद्धच्या वर्ल्ड कप क्वालिफायरमध्ये खेळला होता. त्या सामन्यात त्याच्या गुडघ्याच्या अँटेरियर क्रूसिएट लिगामेंटला गंभीर दुखापत झाली होती. या दुखापतीनंतर तो अनेक महिने फुटबॉलपासून दूर राहिला.

त्याच्या फिटनेसबाबत आणि करिअरबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत होते. काही तज्ज्ञांनी तर नेमारचे करिअर आता उतारावर असल्याचेही म्हटले होते. मात्र, नेमारने हार मानली नाही.

सॅंटोसमध्ये पुनरागमन आणि दमदार कामगिरी

बार्सिलोना आणि पॅरिस सेंट-जर्मेनसारख्या मोठ्या क्लब्ससाठी खेळलेला नेमार गेल्या वर्षी जानेवारीमध्ये आपल्या बालपणीच्या सॅंटोस क्लबमध्ये परतला. तेथून त्याने पुन्हा स्वतःला सिद्ध करण्यास सुरुवात केली.

सॅंटोसकडून खेळताना नेमारने विविध स्पर्धांमध्ये 38 सामन्यांत 17 गोल केले. त्याच्या वेग, ड्रिब्लिंग आणि आक्रमक खेळामुळे तो पुन्हा चर्चेत आला. याच कामगिरीच्या जोरावर त्याला राष्ट्रीय संघात पुनरागमनाची संधी मिळाली.

ब्राझीलच्या चाहत्यांसाठी मोठी आशा

नेमारच्या पुनरागमनामुळे ब्राझीलच्या वर्ल्ड कप मोहिमेला मोठी ताकद मिळाल्याचे मानले जात आहे. विनिसियस ज्युनियर, राफिन्हा, गॅब्रिएल मार्टिनेली आणि एंड्रिक यांसारख्या युवा खेळाडूंसोबत नेमारचा अनुभव संघासाठी निर्णायक ठरू शकतो.

अँसेलोटी यांनी स्पष्ट केले की,
“नेमार हा आमच्यासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. पण हा फक्त एका खेळाडूचा संघ नाही. संपूर्ण टीम एकत्र खेळली तरच ब्राझील विश्वचषक जिंकू शकतो.”

१३ जूनला मोरोक्कोविरुद्ध पहिली लढत

ब्राझील आपल्या फीफा वर्ल्ड कप २०२६ मोहिमेची सुरुवात १३ जून रोजी न्यू जर्सी येथे मोरोक्कोविरुद्ध करणार आहे. त्यानंतर ग्रुप-सीमध्ये संघाचा सामना हैती आणि स्कॉटलंडशी होणार आहे.

ब्राझीलच्या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समतोल साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये ब्राझील पुन्हा एकदा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.


फीफा वर्ल्ड कप २०२६ साठी ब्राझीलचा संघ

गोलरक्षक:

एलिसन, एडरसन, वेवर्टन

बचावपटू:

अ‍ॅलेक्स सॅंड्रो, डॅनिलो, लिओ परेरा, ब्रेमर, इबानेज, वेस्ली, मार्क्विन्होस, गॅब्रिएल मॅगलहेस, डग्लस सॅंटोस

मध्यरक्षक:

ब्रुनो गुईमारेस, कॅसेमिरो, डॅनिलो सॅंटोस, फॅबिन्हो, लुकास पॅक्वेटा

फॉरवर्ड:

एंड्रिक, गॅब्रिएल मार्टिनेली, इगोर थियागो, मॅथियस कुन्हा, राफिन्हा, विनिसियस ज्युनियर, लुईज हेनरिक, नेमार, रेयान

Exit mobile version