कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मधील पुरुषांच्या भालाफेक (जॅव्हलिन थ्रो) स्पर्धेत भारतासाठी आनंदाची बातमी आली आहे. ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्रा, रोहित यादव आणि यशवीर सिंह या भारतीय तिकडीने पात्रता फेरीत दमदार कामगिरी करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता ३१ जुलै रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताला पदकांची मोठी आशा आहे.
तीव्र वाऱ्यामुळे पात्रता फेरीत अचूक भालाफेक करणे आव्हानात्मक ठरले. तरीही भारतीय तिकडीने अव्वल १२ मध्ये स्थान मिळवत अंतिम फेरीचे तिकीट निश्चित केले.
नीरज चोप्रा यांनी ७९.६१ मीटरचा सर्वोत्तम प्रयत्न करत पाचवे स्थान मिळवले. रोहित यादव यांनी ७८.३७ मीटर भालाफेक करून नववा क्रमांक पटकावला, तर यशवीर सिंह यांनी ७८.३६ मीटर अंतर गाठत दहावे स्थान मिळवले. रोहित आणि यशवीर यांच्या कामगिरीत केवळ एक सेंटीमीटरचा फरक होता.
अंतरापेक्षा अंतिम फेरीत पोहोचण्यावर भर देत तिन्ही भारतीय खेळाडूंनी सुरक्षित खेळ केला. नीरज यांनी दुसऱ्या प्रयत्नात ७९.६१ मीटरची भालाफेक केल्यानंतर अंतिम फेरी निश्चित झाल्याने तिसरा प्रयत्न न करण्याचा निर्णय घेतला.
पात्रता फेरीत श्रीलंकेच्या रुमेश पथिराज यांनी ८२.८४ मीटर भालाफेक करून अव्वल स्थान पटकावले. ग्रेनाडाचा दोन वेळचा विश्वविजेता अँडरसन पीटर्स (८१.२९ मीटर) दुसऱ्या, तर दक्षिण आफ्रिकेचा डौव स्मिट (८०.६४ मीटर) तिसऱ्या स्थानावर राहिला.
याशिवाय इंग्लंडचा बेन ईस्ट (८०.३८ मीटर), ऑस्ट्रेलियाचा कॅमेरॉन मॅकिन्टायर (७८.९१ मीटर), पाकिस्तानचा अर्शद नदीम (७८.६३ मीटर), बहामासचा कीशॉन स्ट्रॅचन (७८.६० मीटर), त्रिनिदाद आणि टोबॅगोचा केशॉर्न वॉलकॉट (७८.२६ मीटर) आणि नायजेरियाचा चिनेचेरेम न्नामदी (७५.२७ मीटर) यांनीही अंतिम फेरीत प्रवेश केला.
विशेष म्हणजे, पात्रता फेरीत फक्त चार खेळाडूंनाच ८० मीटरचा टप्पा पार करता आला, तर ८४ मीटरच्या थेट पात्रता निकषापर्यंत एकाही खेळाडूला पोहोचता आले नाही. त्यामुळे अंतिम फेरीत नीरज चोप्रासह भारतीय तिकडीकडून पदकाची अपेक्षा अधिकच वाढली आहे.
