कॉमनवेल्थ गेम्स २०२६ मध्ये भारताच्या पदकसंख्येत रविवारी आणखी एका पदकाची भर पडली. पुरुषांच्या ६० किलो वजनी गटातील वेटलिफ्टिंग स्पर्धेत ऋषिकांत सिंह चनंबम याने दमदार कामगिरी करत रौप्यपदक पटकावले. त्याने एकूण २६४ किलो (स्नॅच १२१ किलो + क्लीन अँड जर्क १४३ किलो) वजन उचलले. मलेशियाच्या मोहम्मद अनिक (२७३ किलो) याने सुवर्णपदक, तर केनियाच्या जोशुआ अमूंगा मबोया (२६० किलो) याने कांस्यपदक जिंकले.
स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच ऋषिकांतने प्रभावी कामगिरी केली. स्नॅच प्रकारात त्याने अनुक्रमे ११६, ११९ आणि १२१ किलो वजन यशस्वीरीत्या उचलले. १२१ किलो वजन उचलत त्याने कॉमनवेल्थ गेम्समधील स्नॅचचा नवा विक्रम आपल्या नावावर केला आणि या फेरीत अव्वल स्थान मिळवले.
क्लीन अँड जर्कमध्ये त्याने पहिल्याच प्रयत्नात १४३ किलो वजन उचलत पदकाच्या शर्यतीत मजबूत दावेदारी कायम ठेवली. मात्र, दुसऱ्या प्रयत्नात १४८ किलो वजन उचलण्यात तो अपयशी ठरला. याचाच फायदा घेत मलेशियाच्या अनिकने १४९ किलो वजन उचलत आघाडी घेतली.
सुवर्णपदकासाठी ऋषिकांतने अखेरच्या प्रयत्नात १५१ किलो वजन उचलण्याचा प्रयत्न केला. वजन खांद्यापर्यंत (क्लीन) आणण्यात तो यशस्वी झाला, मात्र जर्क पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याने त्याचे एकूण वजन २६४ किलो इतकेच राहिले आणि त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
दरम्यान, मोहम्मद अनिकने अखेरच्या प्रयत्नात १५२ किलो वजन उचलत एकूण २७३ किलोची नोंद केली आणि कॉमनवेल्थ गेम्सचा नवा विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक जिंकले. केनियाच्या जोशुआ अमूंगा मबोया याने २६० किलो वजनासह कांस्यपदक पटकावले.
या पदकासह भारताच्या खात्यात आता एक रौप्य आणि एक कांस्य अशी दोन पदके जमा झाली असून पदकतालिकेत भारत दहाव्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलिया अव्वल, इंग्लंड दुसऱ्या, तर नायजेरिया तिसऱ्या स्थानावर आहे.
