मेलबर्न कसोटी इंग्लंडने जिंकली, २०११ नंतरचा पहिला विजय

इंग्लंडने प्रतिष्ठा राखली

मेलबर्न कसोटी इंग्लंडने जिंकली, २०११ नंतरचा पहिला विजय

ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला लागलेली दीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे. मेलबर्नमध्ये खेळल्या गेलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने दुसऱ्याच दिवशी ऑस्ट्रेलियावर ४ विकेट्सनी विजय मिळवला. हा विजय इंग्लंडच्या आत्मसन्मान आणि आत्मविश्वासासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. इंग्लंडसमोर विजयासाठी १७५ धावांचे लक्ष्य होते. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता ऑस्ट्रेलिया ३-१ अशी आघाडीवर आहे.

१७५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडला जॅक क्रॉली आणि बेन डकेट यांनी ५१ धावांची भक्कम सुरुवात करून दिली. डकेट २६ चेंडूत ३४  धावा करून बाद झाला, तर क्रॉलीने ३७ धावा केल्या. या दोन्ही सलामीवीरांव्यतिरिक्त जेकब बेथेलने ४० धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत मालिकेतील इंग्लंडचा पहिला विजय शक्य केला. हॅरी ब्रूक १८ आणि जेमी स्मिथ ३ धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडने ६ विकेट्स गमावत १७८ धावा करत सामना जिंकला.

याआधी, ऑस्ट्रेलियाने दिवसाची सुरुवात बिनबाद ४ धावांपासून केली होती. पहिल्या विकेटच्या रूपाने स्कॉट बोलंड २२ धावांवर बाद झाला. त्याने ६ धावा केल्या. त्यानंतर नियमित अंतराने विकेट्स पडत गेल्या आणि संपूर्ण संघ १३२ धावांत गारद झाला. ट्रॅव्हिस हेडने ४६, स्टीव्ह स्मिथने २४ आणि कॅमेरॉन ग्रीनने १९ धावा केल्या.

हे ही वाचा:

मुंबईत ३६ कोटींचे हेरॉईन जप्त

कंबोडिया- थायलंड तात्काळ युद्धबंदीवर सहमत!

झेप्टोला २०२५ मध्ये १७७ टक्के तोटा

इस्लामी जमावाची संगीत कार्यक्रमावर दगडफेक; २० जण जखमी

इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने ४, कर्णधार बेन स्टोक्सने ३, जोश टंगने २ आणि गस एटकिंसनने १ विकेट घेतली. इंग्लंडने पहिल्या डावात ११० धावा केल्या होत्या. हॅरी ब्रूकने ४१, गस एटकिंसनने २८ आणि कर्णधार बेन स्टोक्सने १६ धावा केल्या. पहिल्या डावाच्या आधारे इंग्लंड ऑस्ट्रेलियापेक्षा ४२ धावांनी पिछाडीवर होता. ऑस्ट्रेलियाकडून मायकेल नेसरने ४, स्कॉट बोलंडने ३, मिचेल स्टार्कने २ आणि कॅमेरॉन ग्रीनने १ विकेट घेतली.

नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १५२ धावा केल्या होत्या. इंग्लंडकडून जोश टंगने ५, गस एटकिंसनने २, तर ब्रायडन कार्स आणि बेन स्टोक्स यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. मेलबर्न कसोटीचा निकाल १४२ षटकांत लागला. या दरम्यान एकूण ३६ विकेट्स पडल्या. जानेवारी २०११ नंतर इंग्लंडला ऑस्ट्रेलियात मिळालेला हा पहिला कसोटी विजय आहे.

Exit mobile version