अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी झालेल्या टी-२० वर्ल्ड कप २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडवर ९६ धावांनी शानदार विजय मिळवला. या विजयासह टीम इंडिया तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक विजेती ठरली.
भारताच्या या यशात खेळाडूंइतकीच मोठी भूमिका मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचीही राहिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत दोन आयसीसी स्पर्धा जिंकल्या आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धांच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंडशीच झाला होता. दोन्ही वेळा न्यूझीलंडचे नेतृत्व मिचेल सॅन्टनर करत होते.
९ मार्च २०२५ रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्या सामन्यात न्यूझीलंडने ७ बाद २५१ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताने ४९ षटकांत लक्ष्य गाठले.
याच्या जवळपास एका वर्षानंतर अहमदाबादमध्ये भारताने प्रथम फलंदाजी करत ५ बाद २५५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव १९ षटकांत १५९ धावांवर आटोपला.
गौतम गंभीरचा मोठ्या सामन्यांतील अनुभवही भारतीय संघासाठी महत्त्वाचा ठरला आहे. २००७ च्या टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये गंभीरने ७५ धावांची खेळी करत भारताला पाकिस्तानविरुद्ध ५ धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच २०११ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने ९७ धावा करत श्रीलंकेविरुद्ध भारताला ६ विकेट्सने विजय मिळवून देण्यात मोठा वाटा उचलला होता.
प्रशिक्षक म्हणून गंभीरने आपल्या निर्णयक्षमतेने आणि रणनीतीने स्वतःला कुशल कोच म्हणून सिद्ध केले आहे. युवा खेळाडूंवर विश्वास ठेवत त्याने संघाला आक्रमक आणि संतुलित क्रिकेट खेळण्याची प्रेरणा दिली.
खेळाडू म्हणून दोन विश्वचषक जिंकलेल्या गंभीरने कर्णधार म्हणून कोलकाता नाईट रायडर्सला २०१२ आणि २०१४ मध्ये आयपीएल विजेते केले. त्यानंतर मेंटॉर म्हणून लखनऊ सुपर जायंट्सला २०२२ आणि २०२३ मध्ये प्लेऑफपर्यंत पोहोचवले. २०२४ मध्ये त्याच्या मेंटॉरशिपमध्ये केकेआर पुन्हा आयपीएल चॅम्पियन झाली.
२०२४ मध्ये गंभीरकडे भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी देण्यात आली. सुरुवातीला काही अडचणी आल्या, मात्र त्यानंतर त्याने स्वतःला कुशल रणनीतिकार म्हणून सिद्ध करत एका वर्षात भारताला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून दिल्या.
