श्री देव रवळनाथ पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

श्री देव रवळनाथ पहिला वर्धापन दिन उत्साहात साजरा होणार

पेडणे येथील श्री देवी भगवती, रवळनाथ व तद्नुशांगिक देवालय समितीच्या वतीने श्री देव रवळनाथ मंदिराचा पहिला वर्धापन दिन शुक्रवार, ६ फेब्रुवारी २०२६ (माघ कृ. ५) रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

सकाळी ८.०० वाजता लघुरुद्र स्वाहाकाराने कार्यक्रमांची सुरुवात होईल. त्यानंतर विधीवत पूजा, धूपारती आणि महाआरती पार पडणार असून दुपारी भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सायंकाळी ५.०० वाजता सुरू होणार आहे. प्रसिद्ध कलाकार गौतमी आमोणकर (गोवा) यांचा तबला सोलो कार्यक्रम रसिकांना अनुभवता येणार आहे. त्यानंतर सायंकाळी ७.०० वाजता द्रुशल गुरुदेव च्यारी व ऋतीकेश गुरुदेव च्यारी यांच्या शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनाचा बहारदार कार्यक्रम होणार आहे. त्यांना तबल्यावर श्री. संकेत खलप, हार्मोनियमवर श्री. प्रसाद गांवस आणि पखवाजवर श्री. किशोर तेली साथसंगत करणार आहेत.

रात्री ९.०० वाजता पालखी उत्सवाने दिवसाची सांगता होणार असून, या सोहळ्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थान समितीने केले आहे.

धार्मिक वातावरण, सांस्कृतिक कार्यक्रमांची रंगत आणि भक्तिभावाने नटलेला हा वर्धापन दिन सोहळा पेडणे परिसरासाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

Exit mobile version