भारतीय पुरुष हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने आगामी एफआयएच हॉकी वर्ल्ड कपमध्ये तब्बल ५१ वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. १९७५ मध्ये भारताने अखेरचा वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर पुन्हा एकदा विश्वविजेतेपद पटकावण्याची भारतीय संघाला प्रतीक्षा आहे.
“वर्ल्ड कप आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. संघात अनेक अनुभवी खेळाडू आहेत. आम्ही केलेली मेहनत आणि प्रशिक्षण पाहता हा वर्ल्ड कप जिंकण्याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ट्रॉफी मायदेशी आणणे हेच आमचे लक्ष्य आहे,” असा विश्वास हरमनप्रीतने व्यक्त केला.
‘अंडरडॉग’ असणं भारताच्या फायद्याचं!
या स्पर्धेत भारत अंडरडॉग म्हणून मैदानात उतरेल, असं हरमनप्रीतचं मत आहे. मात्र अपेक्षांचं ओझं न घेता जागतिक स्तरावर आपली क्षमता सिद्ध करण्याची ही मोठी संधी असल्याचं त्याने सांगितलं.
टोकियो आणि पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सलग पदकं जिंकण्याची कामगिरी भारतीय संघासाठी मोठी प्रेरणा ठरली आहे. त्यामुळे आत्मविश्वास उंचावलेला असला तरी वर्ल्ड कपचा प्रवास सोपा नसेल, याची जाणीव संघाला आहे.
डिफेन्स हाच भारताचा कणा!
हरमनप्रीतच्या मते, भारताच्या वर्ल्ड कप मोहिमेत संघटित आणि शिस्तबद्ध बचाव निर्णायक ठरणार आहे. फुल प्रेस, हाफ-कोर्ट प्रेस आणि लो प्रेस अशा वेगवेगळ्या बचावात्मक पद्धतींवर भारतीय संघाने सराव केला आहे.
“चांगला बचाव केला तर प्रतिस्पर्ध्याच्या क्षेत्रात दबाव निर्माण करण्याच्या अधिक संधी मिळतात. ५०-५० संधींचं गोलमध्ये रूपांतर करणं, दबावाखाली अचूक पासिंग करणं आणि गोल किंवा पेनल्टी कॉर्नर मिळवणं महत्त्वाचं ठरेल,” असं हरमनप्रीतने स्पष्ट केलं.
‘कोण गोल करतोय हे महत्त्वाचं नाही!’
संघातील प्रत्येक खेळाडूने एकमेकांवर विश्वास ठेवणं ही भारताची मोठी ताकद असल्याचं कर्णधाराने सांगितलं.
“कोण गोल करतो किंवा कोण बचाव करतो, यापेक्षा संघ म्हणून आपण जिंकणं महत्त्वाचं आहे. ट्रॉफी उचलणं हेच आमचं अंतिम लक्ष्य आहे. त्यासाठी आम्ही पूर्ण ताकद पणाला लावू,” असा निर्धार हरमनप्रीतने व्यक्त केला.
१९७५ नंतर पुन्हा एकदा हॉकी वर्ल्ड कपची ट्रॉफी भारतात आणण्याचं स्वप्न घेऊन टीम इंडिया मैदानात उतरणार आहे.
