श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारताला मोठा धक्का बसला. उपकर्णधार केएल राहुलला स्नायूंमध्ये तीव्र गोळे आल्याने ७७ धावांवर रिटायर्ड हर्ट व्हावे लागले. त्यामुळे तिसऱ्या सत्रात त्याला पुन्हा फलंदाजी करता आली नाही.
राहुलने १६२ चेंडूंचा सामना करत ९ चौकार आणि एका षटकारासह ७७ धावा केल्या होत्या. डावाच्या ५१व्या षटकात त्याच्या उजव्या हाताच्या पुढील भागात गोळे आल्याने फिजिओने मैदानातच त्याच्यावर उपचार केले होते.
चहापानानंतर राहुल पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात आला. मात्र त्रास वाढल्याने त्याला बॅटही व्यवस्थित पकडता येत नव्हती. डावा हात आणि मनगटातही ताण जाणवू लागला. त्याचबरोबर पायांमध्येही तीव्र त्रास झाल्याने राहुल वेदनेने विव्हळताना आणि लंगडताना दिसला.
अखेर टीम फिजिओच्या मदतीने त्याला मैदानाबाहेर नेण्यात आले. ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या चढतानाही राहुलला मोठा त्रास होत असल्याचे दिसून आले. त्यानंतर फिजिओ कमलेश जैन यांच्या मदतीने तो ड्रेसिंग रूममध्ये पोहोचला.
राहुलने यशस्वी जायस्वाल लवकर बाद झाल्यानंतर डावाची सूत्रे हाती घेतली होती. त्याने देवदत्त पडिक्कलसोबत दुसऱ्या विकेटसाठी १५० धावांची शानदार भागीदारी केली. याचदरम्यान राहुलने आपल्या कसोटी कारकिर्दीतील २१वे अर्धशतक पूर्ण केले.
राहुल रिटायर्ड हर्ट झाल्यानंतर कर्णधार शुभमन गिल फलंदाजीला आला आणि पडिक्कलसोबत डाव पुढे नेला. गिल १६ धावांवर बाद झाला.
दरम्यान, पडिक्कलने संधीचे सोने करत कारकिर्दीतील पहिले कसोटी शतक झळकावले. दिवसाचा खेळ थांबला तेव्हा तो १० चौकारांसह १०७ धावांवर नाबाद होता.
भारताने ६३ षटकांत २ बाद २३९ धावा केल्या होत्या. त्यानंतर पावसामुळे खेळ थांबवण्यात आला. राहुल पुन्हा भारताच्या पहिल्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरू शकेल का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
