‘हिटमॅन’ रोहित शर्माने विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून खेळताना जबरदस्त फटकेबाजी करत लिस्ट-ए कारकिर्दीतील सर्वात वेगवान शतक झळकावले. सिक्किमविरुद्धच्या सामन्यात रोहितने अवघ्या ६२ चेंडूंमध्ये शतक पूर्ण केले आणि ९४ चेंडूंमध्ये ९ षटकार व १८ चौकारांसह १५५ धावांची खेळी साकारली.
सवाई मानसिंह स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर विजय हजारे स्पर्धेत स्पर्धेत मुंबईने संघाने ८ विकेट्सनी सहज विजय मिळवला.
टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या सिक्किमने ५० षटकांत ७ विकेट्स गमावत २३६ धावा केल्या. संघाची सुरुवात खराब झाली आणि अवघ्या ५ धावांवर पहिली विकेट पडली. त्यानंतर साई सात्विक व आशीष थापा यांनी डाव सावरला. आशीष थापाने ८७ चेंडूंमध्ये ८ चौकारांसह ७९ धावा केल्या, तर क्रांती कुमारने ३४ धावांचे योगदान दिले. रॉबिन नाबाद ३१ धावा करून परतला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने २ विकेट्स घेतल्या, तर तुषार देशपांडे, तनुष कोटियान, शम्स मुलानी आणि मुशीर खान यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.
लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने केवळ ३०.३ षटकांत सामना जिंकला. रोहित व अंगकृष रघुवंशी यांनी १४१ धावांची सलामी दिली. अंगकृष ३८ धावांवर बाद झाल्यानंतर रोहितने मुशीर खानसोबत ५८ चेंडूंमध्ये ८५ धावांची भागीदारी करत विजय निश्चित केला. रोहित १५५ धावांवर बाद झाला, तर मुशीर खान २६ चेंडूंमध्ये नाबाद २७ धावा करून संघाला विजय मिळवून दिला.
