२०२६ : क्रिकेटसाठी जागतिक स्तरावर निर्णायक ठरण्याची चिन्हे

२०२६ : क्रिकेटसाठी जागतिक स्तरावर निर्णायक ठरण्याची चिन्हे

नव्या वर्षाच्या सुरुवातीसच क्रिकेटप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. गेलं वर्ष भारतीय क्रिकेटसाठी उत्साहवर्धक ठरलं आणि २०२६ हे वर्ष तर आणखी निर्णायक ठरण्याची चिन्हे आहेत. कारण, या वर्षात क्रिकेटच्या सर्वात लोकप्रिय फॉरमॅटमधील मेगा इव्हेंट — टी२० विश्व कप २०२६ — खेळवला जाणार आहे.

टी२० विश्व कपची सुरुवात सात फेब्रुवारीपासून होणार असून हा स्पर्धा आठ मार्चपर्यंत रंगणार आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारा हा टी२० विश्व कप या स्पर्धेचा दहावा हंगाम आहे. भारतीय उपखंडात होणारा हा विश्व कप क्रिकेटच्या जागतिक विस्तारासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

यंदाच्या विश्व कपचं वैशिष्ट्य म्हणजे तब्बल वीस संघांचा सहभाग. प्रथमच टी२० विश्व कपमध्ये इतक्या मोठ्या संख्येने संघ सहभागी होत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी)च्या क्रिकेटचा जागतिक प्रसार करण्याच्या धोरणाचा हा एक महत्त्वाचा भाग आहे. सध्या जगभरात सुमारे शंभराहून अधिक देशांत क्रिकेट खेळलं जातं. त्यापैकी बारा देशांना कसोटी दर्जा असून उर्वरित असोसिएट राष्ट्रे आहेत.

या विश्व कपमध्ये भारत, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश, अफगाणिस्तान यांसारख्या बलाढ्य संघांसह अमेरिका, कॅनडा, नेदरलँड्स, नामिबिया, नेपाळ, ओमान, यूएई, आयर्लंड, झिम्बाब्वे आणि इटली हे संघ सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे इटली प्रथमच टी२० विश्व कपमध्ये खेळताना दिसणार आहे. सर्व वीस संघांना पाच-पाच संघांच्या चार गटांत विभागण्यात आलं आहे.

टी२० हा क्रिकेटचा सर्वात छोटा आणि वेगवान फॉरमॅट असून तो दिवसेंदिवस सर्वाधिक लोकप्रिय ठरत आहे. विश्व कपसारख्या मोठ्या स्पर्धांमुळे या फॉरमॅटचा जागतिक स्तरावर मोठा प्रसार होतो. यंदाच्या स्पर्धेत जर तुलनेनं कमी अनुभव असलेले संघ मोठ्या संघांना धक्के देण्यात यशस्वी ठरले, तर जागतिक क्रिकेटमध्ये नव्या स्पर्धात्मक पर्वाची सुरुवात होऊ शकते.

लहान संघांच्या सातत्यपूर्ण यशामुळे भविष्यात टी२० विश्व कपसारख्या स्पर्धांमध्ये संघसंख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. आयसीसीसाठीही ही सकारात्मक बाब ठरेल, कारण क्रिकेटला जागतिक स्तरावर फुटबॉलसारखी लोकप्रियता मिळवून देण्याचं स्वप्न संघटनेनं पाहिलं आहे.

एकूणच, २०२६ हे वर्ष टी२० विश्व कपच्या निमित्तानं क्रिकेटच्या इतिहासात महत्त्वाचं वळण ठरू शकतं. या स्पर्धेचं यश केवळ टी२० नव्हे, तर संपूर्ण क्रिकेटविश्वासाठी नव्या शक्यता आणि संधी घेऊन येणार आहे.

Exit mobile version