भारताविरुद्ध बहिष्कार; आयसीसीचा पाकिस्तानला कडक इशारा

भारताविरुद्ध बहिष्कार; आयसीसीचा पाकिस्तानला कडक इशारा

पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्धचा सामना न खेळण्याचा पाकिस्तानचा निर्णय जागतिक क्रिकेटच्या तत्त्वांना धक्का देणारा ठरू शकतो, असा स्पष्ट इशारा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दिला आहे. या निर्णयाचे पाकिस्तानमधील क्रिकेटवर दीर्घकालीन परिणाम होऊ शकतात, असेही आयसीसीने नमूद केले.

पाकिस्तान सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करत श्रीलंकेत स्पर्धेसाठी संघाला परवानगी दिली असल्याचे सांगितले. मात्र १५ फेब्रुवारीला कोलंबोतील आर. प्रेमदासा स्टेडियमवर भारताविरुद्ध होणारा सामना न खेळण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले. या निर्णयामागचे कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही. आयसीसीने या संदर्भात पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (पीसीबी) अधिकृत माहितीची प्रतीक्षा असल्याचे सांगितले.

आयसीसीच्या निवेदनात म्हटले आहे की, “आयसीसी स्पर्धा या निष्पक्षता, सातत्य आणि खेळाच्या पावित्र्यावर आधारित असतात. पात्र संघांनी नियोजित वेळापत्रकानुसार समान अटींवर स्पर्धा करणे अपेक्षित असते. निवडक सहभाग हा जागतिक स्पर्धेच्या मूलभूत तत्त्वांशी सुसंगत नाही.”

आयसीसीने पुढे स्पष्ट केले की, राष्ट्रीय धोरणांच्या बाबतीत सरकारांची भूमिका मान्य असली तरी अशा निर्णयामुळे जागतिक क्रिकेटच्या परिसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. “पीसीबीने या निर्णयाचे आपल्या देशातील क्रिकेटवर होणारे दीर्घकालीन परिणाम विचारात घ्यावेत,” असे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, पाकिस्तान जर भारताविरुद्धचा सामना बहिष्कृत करत असेल तर त्यांना दोन गुण गमवावे लागू शकतात. आयसीसीच्या नियमांनुसार अशा परिस्थितीत नेट रन रेटवरही परिणाम होईल. क्लॉज १६.१०.७ नुसार, बहिष्कार केल्यास त्या संघाची संपूर्ण २० षटकांची डावसंख्या गणली जाईल आणि सरासरी धावगतीच्या हिशेबात ती समाविष्ट केली जाईल.

ग्रुप-अ मध्ये पाकिस्तानसोबत भारत, नामिबिया, नेदरलँड्स आणि अमेरिका हे संघ आहेत. पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असून ७ फेब्रुवारीला नेदरलँड्सविरुद्ध त्यांची मोहिम सुरू होणार आहे.

या घडामोडींमुळे विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून जागतिक क्रिकेटविश्वाचे लक्ष आता पीसीबीच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

Exit mobile version