पाकिस्तानवर मात करत भारताचा सुवर्ण विजय

एफआयएच यूथ हॉकी5एस आशिया चॅम्पियनशिप

पाकिस्तानवर मात करत भारताचा सुवर्ण विजय

एफआयएच यूथ हॉकी5एस आशिया चॅम्पियनशिपमध्ये भारतीय सब-ज्युनियर पुरुष संघाने दमदार कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम सामन्यात भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा ३-१ असा पराभव करून आशियाई विजेतेपद आपल्या नावावर केले.

भारताच्या विजयात रोमित पाल (५वे मिनिट), कर्णधार केतन कुशवाहा (१२वे मिनिट) आणि शाहरुख अली (१३वे मिनिट) यांनी प्रत्येकी एक गोल करत महत्त्वाची भूमिका बजावली. भारताने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत अचूक पासिंग आणि शिस्तबद्ध खेळाच्या जोरावर पाकिस्तानला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.

पाकिस्तानकडून मुहम्मद उस्मान याने १६व्या मिनिटाला एकमेव गोल केला. अंतिम फेरी गाठल्यामुळे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी पहिल्या एफआयएच यूथ हॉकी5एस विश्वचषकासाठी पात्रता मिळवली आहे.

दरम्यान, भारतीय महिला संघाला अंतिम फेरीत चीनकडून ४-२ असा पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे महिला संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

दोन्ही संघांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव करत हॉकी इंडियाने रोख पारितोषिकांची घोषणा केली आहे. सुवर्णपदक विजेत्या पुरुष संघातील प्रत्येक खेळाडूला ₹२ लाख, तर सहाय्यक प्रशिक्षक व सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला ₹१ लाख देण्यात येणार आहेत. तसेच, रौप्यपदक विजेत्या महिला संघातील प्रत्येक खेळाडूला ₹१ लाख आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला ₹५० हजार देण्यात येणार आहेत.

Exit mobile version