तिरंदाजांचा दबदबा! १० पदकांसह भारताने एशिया कप गाजवला

तिरंदाजांचा दबदबा! १० पदकांसह भारताने एशिया कप गाजवला

आर्चरी एशिया कपमध्ये भारताच्या कंपाउंड तिरंदाजांनी शानदार कामगिरी करत आपला दबदबा सिद्ध केला. पुरुष वैयक्तिक, टीम, मिक्स्ड आणि महिला स्पर्धांमध्ये भारताने उत्कृष्ट प्रदर्शन करत एकूण १० पदकं पटकावली. यात २ सुवर्ण, ४ रौप्य आणि ४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

पुरुषांच्या वैयक्तिक कंपाउंड अंतिम फेरीत उदय कांबोजने एशियन गेम्स पदक विजेता प्रथमेश जावकरचा १४५-१४४ असा पराभव करत सुवर्णपदक जिंकले. तसेच रजत चौहानने थायलंडच्या पीरावत रत्नापोंगकियातला १४५-१४४ ने हरवत भारतासाठी ‘क्लीन स्वीप’ पूर्ण केला.

महिलांच्या वैयक्तिक कंपाउंड स्पर्धेत तेजल साल्वेने मारिया डिमिडियुकवर १४४-१३५ अशी मात करत कांस्यपदक मिळवले.

मिक्स्ड टीम कंपाउंड स्पर्धेत—जी लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमध्ये प्रथमच समाविष्ट होणार आहे—भारताच्या चिकीता तानिपार्थी आणि रजत चौहान या जोडीने मलेशियाच्या जोडीला १५८-१५६ ने हरवत सुवर्णपदक जिंकले.

महिला कंपाउंड टीममध्ये चिकीता तानिपार्थी, राज कौर आणि तेजल साल्वे यांनी अंतिम फेरी गाठली, मात्र कझाकिस्तानविरुद्ध २२९-२२७ ने पराभव झाल्यामुळे त्यांना रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

रिकर्व प्रकारातही भारताने दोन पदकं जिंकली. महिलांच्या वैयक्तिक अंतिम फेरीत रिधीला मंगोलियाच्या ओयुन-एर्डेन बासांडोर्जकडून ६-२ ने पराभव स्वीकारावा लागला आणि तिला रौप्यपदक मिळाले. तर पुरुषांच्या रिकर्व टीमला कझाकिस्तानविरुद्ध ५-४ अशी निसटती हार पत्करावी लागली आणि रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

याआधी महिलांच्या रिकर्व टीमने मलेशियावर ५-१ ने विजय मिळवत कांस्यपदक जिंकले होते. तसेच पुरुषांच्या कंपाउंड टीमने भूटानला २३४-२३२ ने हरवत आणखी एक कांस्य पदक भारताच्या खात्यात जमा केले.

Exit mobile version