ईडन गार्डन्स येथे खेळल्या गेलेल्या कमी धावसंख्येच्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतावर ३० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. मालिकेचा दुसरा सामना २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळवला जाईल. दक्षिण आफ्रिकेने २०१०नंतर प्रथमच भारतात भारतीय संघाला पराभूत केले आहे.
भारताला दुसऱ्या डावात विजयासाठी फक्त १२४ धावांचे लक्ष्य मिळाले होते, पण टीम इंडिया केवळ ९३ धावांवरच गडगडली. कर्णधार शुभमन गिल मानेला दुखापत झाल्याने दुसऱ्या डावात फलंदाजीला तो उतरू शकला नाही
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणारी दक्षिण आफ्रिका संघ पहिल्या डावात फक्त १५९ धावांवर गडगडला. एडेन मार्करमने ३१ धावा केल्या, तर वियान मुल्डर आणि टोनी डी जोरजी यांनी प्रत्येकी २४ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ५ बळी घेतले, तर मोहम्मद सिराज आणि कुलदीप यादव यांनी २-२ विकेट घेतल्या.
हे ही वाचा:
नागरिकांना सशक्त करण्यासाठी सरकारचे काय आहेत प्रयत्न ?
दुबई एअर शोमध्ये दिसणार भारताची क्षमता
उपराज्यपालांनी जम्मू पोलिसांच्या शौर्याची केली प्रशंसा
ग्वाल्हेरमध्ये भीषण अपघातात पाच मित्रांचा मृत्यू
भारताच्या पहिल्या डावात १८९ धावा
दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावातील १५९ धावांना उत्तर देताना भारताचीही स्थिती काही चांगली नव्हती. प्रतिसादात भारताचा डाव देखील १८९ धावांवर संपला. केएल राहुलने सर्वाधिक ३९ धावा केल्या, तर वॉशिंग्टन सुंदरने २९ धावा जोडल्या. दक्षिण आफ्रिकेकडून साइमन हार्मरने ४ विकेट घेतल्या, तर मार्को जेनसनला ३ बळी मिळवता आले. पहिल्या डावाच्या आधारावर भारताला अवघी ३० धावांची आघाडी मिळाली होती.
दुसऱ्या डावात कर्णधार टेंबा बावुमा चौथ्या क्रमांकावर आला आणि १३६ चेंडूत ४ चौकारांसह नाबाद ५५ धावा केल्या. मात्र, इतर कोणताही फलंदाज त्याला साथ देऊ शकला नाही आणि दक्षिण आफ्रिका १५३ धावांवर बाद झाली. अर्थात, भारताला केवळ १२४ धावा करायच्या होत्या. पण त्या धावा करतानाही भारतीय फलंदाजांची दमछाक झाली. भारताकडून रवींद्र जडेजाने ४ विकेट मिळवल्या, तर कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.
तिसऱ्या दिवसाच्या खेळापूर्वी बीसीसीआयने स्पष्ट केले की, मानेला दुखापत झाल्याने शुभमन गिल उर्वरित सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे यशस्वी जायसवालसोबत केएल राहुल सलामी फलंदाजीला उतरला. पण चौथ्याच चेंडूवर जायसवाल बाद झाला. तिसऱ्या षटकात राहुलही (१) माघारी परतला. त्यानंतर वॉशिंग्टन सुंदर आणि ध्रुव जुरेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी ३२ धावांची भागीदारी करत भारतीय डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण भागीदारी मोडल्यानंतर पुन्हा फलंदाजांची गळती सुरू झाली.
दरम्यान अक्षर पटेलने १७ चेंडूत २ षटकार व १ चौकारांसह २६ धावा केल्या.३५व्या षटकात त्याने तीन चौकार मारले, पण टीमला विजय मिळवून देऊ शकला नाही. दक्षिण आफ्रिकेकडून साइमन हार्मरने पुन्हा सर्वाधिक ४ विकेट घेतल्या, तर मार्को जेनसन आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. एडेन मार्करमने एक विकेट घेतली.
