गिलसोबतचा प्रवास, सुदर्शनचा विकास!

गिलसोबतचा प्रवास, सुदर्शनचा विकास!

गुजरात टायटन्सच्या सलामीवीराने – साई सुदर्शनने – आपल्या मनातलं गुपित शेअर केलंय… गेली तीन वर्षं जीटीसाठी खेळताना शुभमन गिलसोबत मैदानावर घालवलेला प्रत्येक क्षण, त्याच्यासाठी अनमोल ठरलाय.

IPL 2025 मध्ये साई सुदर्शन जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. 10 सामन्यांत 504 धावा आणि त्यातल्या 5 अर्धशतकांनी त्याने आपली ताकद दाखवून दिलीय. त्याच्या बॅटमधून येणाऱ्या या धावांचं श्रेय तो एका व्यक्तीला देतो – शुभमन गिल!

‘जिओ हॉटस्टार’च्या ‘जेन बोल्ड’ शोमध्ये साई भावूक होऊन सांगतो,
“गेल्या 3 वर्षांत जेव्हा जेव्हा अडचणीत आलो, तेव्हा गिलशी संवाद साधला. त्याने मला मार्गदर्शन केलं, आधार दिला. तो फक्त कॅप्टन नाही – तो एक समजूतदार नेता आहे. तो जाणतो, खेळाडूला कोणत्या क्षणी काय हवं असतं. अशा कठीण वेळेला तो संधी देतो, विश्वास ठेवतो… आणि त्यातूनच मैत्री निर्माण होते.”

या सिजनबद्दल बोलताना साई म्हणतो,
“ऑरेंज कॅप मिळणं हा एक प्रवास आहे, पण माझं लक्ष्य कधीच वैयक्तिक बक्षिसांवर नव्हतं. मी माझ्या संघासाठी, संघाच्या विजयासाठी खेळतो. जर तुम्ही ऑरेंज कॅपचाच विचार करत बसलात, तर टीमपेक्षा स्वतःचा विचार करता आणि तिथंच खेळाडू हरतो. मला संघासाठी सतत योगदान द्यायचं आहे – हेच खरं यश.”

गुजरात टायटन्सच्या फ्रँचायझीकडून मिळालेल्या विश्वासाबद्दल तो कृतज्ञतेने म्हणतो,
“माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या टीम मॅनेजमेंटचं, विशेषतः आशीष नेहराचं, मी ऋणी आहे. पहिल्या दिवसापासून त्यांनी मला मान दिला, जबाबदारी दिली – आणि त्यामुळेच मी मैदानावर स्वतःला सिद्ध करू शकलो.”

या सुदर्शनच्या शब्दांतून एक गोष्ट स्पष्ट होते – जेव्हा युवा खेळाडूंना योग्य साथ, विश्वास आणि दिशा मिळते, तेव्हा ते कोणतीही उंची गाठू शकतात!

Exit mobile version