३६ वर्षांची प्रतीक्षा संपली! स्कॉटलंडचा विश्वचषकात विजयी पुनरागमन

३६ वर्षांची प्रतीक्षा संपली! स्कॉटलंडचा विश्वचषकात विजयी पुनरागमन

फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत स्कॉटलंडने इतिहास रचत हैतीचा १-० असा पराभव केला. विशेष म्हणजे, विश्वचषक स्पर्धेत स्कॉटलंडचा हा तब्बल ३६ वर्षांनंतरचा पहिला विजय ठरला. १९९० नंतर प्रथमच स्कॉटलंडला विश्वचषकात विजयाची चव चाखता आली.

याशिवाय, १९८२ नंतर प्रथमच स्कॉटलंडने विश्वचषकातील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला. तसेच १९९८ नंतर पुरुषांच्या विश्वचषकातील हा त्यांचा पहिलाच सामना होता.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच स्कॉटलंडने आक्रमक खेळ करत वर्चस्व गाजवले. ७व्या मिनिटाला स्कॉट मॅकटॉमिनेने हेडरद्वारे गोल करण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू क्रॉसबारच्या वरून गेला. काही वेळानंतर त्याचा आणखी एक प्रयत्न थेट पोस्टला जाऊन धडकला.

सततच्या दबावानंतर २९व्या मिनिटाला स्कॉटलंडला यश मिळाले. चे अ‍ॅडम्सच्या चालीतून निर्माण झालेल्या संधीचा फायदा घेत जॉन मॅकगिन याने बॉक्सच्या बाहेरून जोरदार फटका मारला. चेंडूला डिफ्लेक्शन मिळाल्याने हैतीचा गोलरक्षक जॉनी प्लेसिड फसला आणि चेंडू थेट जाळ्यात जाऊन विसावला.

हैतीचे प्रयत्न अपुरे

गोल खाल्ल्यानंतर हैतीने जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न केला. रूबेन प्रोव्हिडन्स आणि विल्सन इसिडोर यांनी आक्रमणे रचली, मात्र स्कॉटलंडचा गोलरक्षक अँगस गन भक्कमपणे उभा राहिला.

दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी गोलसाठी प्रयत्न केले. मॅकगिनला दुसरा गोल करण्याची सुवर्णसंधी मिळाली होती, मात्र दबावाखाली त्याचा फटका लक्ष्यापासून दूर गेला. दुसरीकडे, सामन्याच्या अखेरच्या क्षणी फ्रँट्झी पिएरोटचा हेडर थोडक्यात बाहेर गेल्याने हैतीची बरोबरीची आशा मावळली.

अखेर स्कॉटलंडने १-० अशी आघाडी कायम राखत ऐतिहासिक विजय आपल्या नावावर केला.

ग्रुप ‘सी’मध्ये अव्वल स्थान

या विजयासह स्कॉटलंडने ग्रुप ‘सी’मध्ये अव्वल स्थान मिळवले आहे. तर हैतीला आता ब्राझील आणि मोरोक्कोविरुद्धच्या आगामी सामन्यांत पुनरागमन करण्याचे आव्हान असेल.

Exit mobile version