मार्को जानसेनचा बळींचा षटकार, दक्षिण आफ्रिकेकडे ३१४ धावांची आघाडी

भारताचा डाव २०१ धावांत गडगडला

मार्को जानसेनचा बळींचा षटकार, दक्षिण आफ्रिकेकडे ३१४ धावांची आघाडी

गुवाहाटीतील बरसापारा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाअखेर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध भक्कम अशी ३१४ धावांची आघाडी मिळवली आहे. दिवसअखेर पाहुण्या संघाने दुसऱ्या डावात २६ धावा केल्या असून एकही विकेट गमावलेली नाही.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ धावा केल्या. या डावात सेनुरन मुथुसामीने शानदार १०९ धावा केल्या, तर मार्को जानसेनने ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. याशिवाय ट्रिस्टन स्टब्सने ४९ धावा योगदान दिले.

भारताकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने ४ विकेट्स घेतल्या तर जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

हे ही वाचा:

हिंदी चित्रपटसृष्टीचा रांगडा अभिनेता धर्मेंद्र कालवश

“अरुणाचल प्रदेश चीनचा भाग” म्हणत शांघाय विमानतळावर भारतीय महिलेला रोखले

पाकिस्तानात आत्मघातकी स्फोट, निमलष्करी दलाच्या मुख्यालयावर हल्ला, तीन जवान ठार

“सिंध भारतात परत येऊ शकतो, सीमा बदलू शकतात”

भारताच्या पहिल्या डावात फक्त २०१

दक्षिण आफ्रिकेच्या मोठ्या धावसंख्येला प्रत्युत्तर देताना भारतीय संघ पहिल्या डावात केवळ २०१ धावांवर गारद झाला.

भारतातर्फे सलामीवीर यशस्वी जायसवालने सर्वाधिक ५८ धावा केल्या तर वॉशिंगटन सुंदरने ४८ धावांची खेळी केली. के.एल. राहुल (२२) आणि यशस्वी यांच्या जोडीने पहिल्या विकेटसाठी चांगली ६५ धावांची भागीदारी दिली. मात्र राहुल बाद झाल्यानंतर भारतीय डाव कोसळला. १२२ धावांपर्यंत भारताचे ७ बाद झाले. यानंतर कुलदीप यादव आणि वॉशिंगटन सुंदरने आठव्या विकेटसाठी ७२ धावा जोडल्या. सुंदर ४८ धावांवर बाद झाला, तर कुलदीपने १९ धावा केल्या.

मार्को जानसेनचा धडाका

दक्षिण आफ्रिका संघाकडून मार्को जानसेनने बळींचा षटकार लगावला. तर सायमन हार्मरने ३ विकेट्स आणि केशव महाराजने १ विकेट घेतली. पहिल्या डावाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने २८८ धावांची विशाल आघाडी घेतली होती. तरीही त्यांनी भारताला फॉलोऑन दिला नाही.

दुसऱ्या डावात आफ्रिकेची सावध सुरुवात

दुसऱ्या डावात सलामीला रायन रिकेल्टन (नाबाद १३) आणि एडन मार्करम (नाबाद १२) यांनी दिवसअखेर अभेद्य भागीदारी करत २६ धावा केलेल्या आहेत.

Exit mobile version