एकदा का विजेतेपदाची चव चाखली की पुन्हा पुन्हा त्याच शिखरावर पोहोचण्याची भूक वाढत जाते. भारतीय महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स सध्या याच मानसिकतेत आहे. २०२५ च्या वनडे विश्वचषकातील विजयानंतर भारतीय संघाची यशाची भूक आणखी वाढली असून, आता पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीवरही तिरंगा फडकवायचा आहे, असा निर्धार जेमिमाने व्यक्त केला.
जेमिमाने ‘जिओस्टार’शी बोलताना सांगितले की, संघाने एकदा यशाचा स्वाद घेतला आहे आणि आता सर्वोच्च स्थानावर राहण्याची इच्छा आणखी वाढली आहे. “तुम्ही जितक्या वेळा यशाची चव चाखता, तितक्याच अधिक ताकदीने पुन्हा त्या ठिकाणी पोहोचण्याची इच्छा होते. आमचा संघ त्यासाठी मेहनत घेत आहे,” असे तिने सांगितले.
विशेष म्हणजे, महिला क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन होत आहे. जेमिमासाठीही ही स्पर्धा खास असणार आहे. “मी पहिल्यांदाच चॅम्पियन्स ट्रॉफीचा भाग होणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा माझ्यासाठी खूप विशेष असेल. मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे,” असे जेमिमाने म्हटले.
विश्वचषक जिंकल्यानंतर संघाच्या मानसिकतेत बदल झाला आहे का, यावरही तिने स्पष्ट मत मांडले. तिच्या मते, विचारसरणी बदललेली नाही; संघाचे लक्ष्य आजही विजय हेच आहे.
मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघासमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल. डिसेंबरमध्ये भारत एक कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-२० सामन्यांची मल्टी-फॉरमॅट मालिका खेळणार आहे.
या मालिकेबाबत जेमिमा म्हणाली की, दोन्ही संघ सध्या चांगली कामगिरी करत आहेत. अलीकडच्या काळात भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये अनेक रोमांचक सामने झाले आहेत. त्यामुळे जगातील दोन अव्वल संघ दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर आमनेसामने येणार असल्याने ही मालिका मोठे आव्हान ठरणार आहे, असे तिने सांगितले.
भारतीय संघाच्या मधल्या फळीतील महत्त्वाची कडी असलेल्या जेमिमाने २०२५ च्या विश्वचषकात निर्णायक भूमिका बजावली होती. आता चॅम्पियन्स ट्रॉफीतही तिच्याकडून तशाच धडाकेबाज कामगिरीची अपेक्षा आहे. विश्वचषकाची ट्रॉफी जिंकून वाढलेली ही ‘यशाची भूक’ चॅम्पियन्स ट्रॉफीत भारतीय महिलांना कुठपर्यंत घेऊन जाते, हे पाहणे रंजक ठरणार आहे.
