दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू असताना, मुंबईत शिवसेना भवन परिसर आणि चेंबूरमध्ये काल ‘नीट’ (NEET) पेपरफुटी प्रकरणी संताप व्यक्त करण्यासाठी विद्यार्थी अचानक एकवटले. हे विद्यार्थी कोणत्याही राजकीय पक्षाने जमवलेले नव्हते; ते स्वयंप्रेरणेने एकत्र आले होते. घडलेल्या प्रकाराबाबत त्यांच्या मनात खरोखरच चीड होती. शिक्षण क्षेत्रात गेली काही दशके निर्माण झालेल्या माफियाराजचे चटके विद्यार्थ्यांना आणि पालकांना वारंवार बसत आहेत. सरकारने या संतापाची दखल घ्यायला हवी. या सगळ्या घडामोडी घडत असताना, कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला खलिस्तानी दहशतवादी गुरपतवंतसिंग पन्नू याने पाठिंबा दिलेला आहे. विद्यार्थ्यांचे नाव घेऊन देशात अराजक माजवण्यासाठी देशविरोधी शक्ती सक्रिय झालेल्या आहेत. मुंबईत काल झालेल्या आंदोलनात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, अमित ठाकरे आणि उबाठाचे आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती लावली होती. तरीही दादर आणि चेंबूरमध्ये जमलेले तरुण हे विद्यार्थीच होते, यावर आम्ही ठाम आहोत. काँग्रेस सरकारच्या काळात शिक्षणाचे बाजारीकरण झाले. शिक्षण व्हिजन/माफियांनी याचा फायदा घेत अब्जावधींचे शिक्षण साम्राज्य उभे केले. हे शिक्षण माफिया इतके गडगंज झाले आहेत की, त्यांना हात लावण्याची कोणाचीही तयारी नाही.
