आयपीएल २०२६: ५ महागडे परदेशी खेळाडू

आयपीएल २०२६: ५ महागडे परदेशी खेळाडू

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ चा मिनी लिलाव मंगळवारी अबू धाबीतील एतिहाद एरिनामध्ये पार पडला. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमरून ग्रीन याच्यावर कोलकाता नाईट रायडर्सने तब्बल २५.२० कोटी रुपये मोजत सर्वात मोठी बोली लावली. यासह कॅमरून ग्रीन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे.

या हंगामात सर्वाधिक रक्कम खर्च करण्यात आलेल्या ५ परदेशी खेळाडूंवर एक नजर

१) कॅमरून ग्रीन

ऑस्ट्रेलियाच्या अष्टपैलू खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्सने २५.२० कोटी रुपये देत संघात घेतले. ग्रीनने आयपीएल २०२३ मध्ये मुंबई इंडियन्सकडून १६ सामने खेळताना १ शतकासह ४५२ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील हंगामात आरसीबीकडून खेळताना त्याने २५५ धावा जमवल्या.

२) मथीशा पथिराना

श्रीलंकेचा २२ वर्षांचा वेगवान गोलंदाज मथीशा पथिरानाचा बेस प्राईस २ कोटी रुपये होता. मात्र, कोलकाताने त्याच्यावर १८ कोटी रुपये खर्च केले. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना त्याने ३२ सामन्यांत ४७ विकेट्स घेतल्या आहेत.

३) लियाम लिव्हिंगस्टोन

इंग्लंडच्या या आक्रमक फलंदाजाला सनरायझर्स हैदराबादने १३ कोटी रुपये देत संघात घेतले. आयपीएल कारकिर्दीत त्याने ४९ सामने खेळत २६.२७ च्या सरासरीने १,०५१ धावा केल्या असून, त्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

४) मुस्तफिजुर रहमान

बांगलादेशचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान याला केकेआरने ९.२० कोटी रुपये मोजले. आयपीएलमध्ये त्याने सनरायझर्स हैदराबाद, मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना ६० सामन्यांत ६५ विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सरासरी २८.४४ इतकी आहे.

५) जोश इंग्लिश

ऑस्ट्रेलियाचा विकेटकीपर-फलंदाज जोश इंग्लिश याला लखनऊ सुपर जायंट्सने ८.६० कोटी रुपये देत संघात सामील करून घेतले. आयपीएल २०२५ मध्ये त्याने पदार्पण करत पंजाब किंग्सकडून ११ सामने खेळले आणि ३०.८८ च्या सरासरीने २७८ धावा केल्या.

Exit mobile version