दिल्ली पोलिसांच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टच्या स्पेशल स्टाफ पथकाने करोल बाग परिसरात प्रीमियम सॅमसंग मोबाईलची बनावट असेंब्ली आणि विक्री करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी ४ आरोपींना अटक करून त्यांच्याकडून ५१२ बनावट प्रीमियम सॅमसंग मोबाईल फोनसह मोठ्या प्रमाणात मोबाईल पार्ट्स जप्त केले आहेत. दिल्ली पोलिसांनी रविवारी जारी केलेल्या प्रेस नोटनुसार, ही टोळी चीनमधून आयात केलेल्या सुटे भागांचा वापर करून सॅमसंगचे अल्ट्रा, फोल्ड आणि फ्लिप यांसारखे हाय-एंड मॉडेल तयार करत होती. या मोबाईलवर बनावट आयएमईआय क्रमांक आणि ‘मेड इन व्हिएतनाम’ असे स्टिकर लावून ते ब्रँडेड असल्याचे भासवत ३५ ते ४० हजार रुपयांना बाजारात विकले जात होते.
१३ डिसेंबर २०२५ रोजी गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. बीडनपुरा, करोल बाग येथील एका दुकानात चोरीचे मोबाईल खरेदी करून तसेच चीनहून आलेल्या सुटे भागांपासून नवे दिसणारे प्रीमियम मोबाईल तयार केले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या फोनमध्ये जुने मदरबोर्ड बसवले जात, बनावट आयएमईआय लावले जात आणि ते खुले बाजारात नवे असल्याचे सांगून विकले जात होते. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन निरीक्षक रोहित कुमार यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात अनेक उपनिरीक्षक, एएसआय, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाई एसीपी ऑपरेशन्स सुलेखा जागरवार, आयपीएस यांच्या देखरेखीखाली पार पडली. पथकाने १ आणि १४ डिसेंबरच्या मध्यरात्री दुकानावर छापा टाकून चार आरोपींना मोबाईल असेंबल करताना रंगेहाथ पकडले. आरोपींची नावे हकीम, मेहताब अहमद अन्सारी, रवि आहूजा आणि राहुल अशी आहेत.
हेही वाचा..
केरळमध्ये ६००चा चमत्कार म्हणजे लोकशाही बळकट असल्याचा पुरावा!
दाट धुक्यामुळे विमानसेवेचे वेळापत्रक विस्कळीत
बंगालमधील सर्व नकारात्मक शक्ती संपुष्टात येईल
बांगलादेशमध्ये मारल्या गेलेल्या हिंदू युवकाने ईशनिंदा केली नव्हती!
दुकानाची झडती घेतली असता ५१२ पूर्ण व अर्धवट तयार प्रीमियम सॅमसंग मोबाईल फोन, १२४ मदरबोर्ड, १३८ बॅटऱ्या, ४५९ बनावट आयएमईआय लेबल्स, मोबाईल बॉक्स, शेकडो अॅक्सेसरीज आणि असेंब्लीसाठी वापरली जाणारी विशेष साधने आढळून आली. चौकशीत आरोपी या वस्तूंबाबत समाधानकारक माहिती देऊ शकले नाहीत. त्यानंतर करोल बाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून चौघांनाही अटक करण्यात आली. पोलिसांच्या कसून चौकशीत समोर आले की, ३६ वर्षीय हकीम हा केवळ आठवीपर्यंत शिकलेला असूनही संपूर्ण नेटवर्क संघटित पद्धतीने चालवत होता. तो चीनमधून कॅमेरा, बॉडी फ्रेम, स्पीकर, बॅक ग्लास आणि मदरबोर्डसारखी सामग्री मागवून सहकाऱ्यांच्या मदतीने जास्त मागणी असलेले सॅमसंग मोबाईल तयार करत होता आणि ते महाग दराने विकून मोठा नफा कमावत होता. पोलिस आता या नेटवर्कची पुरवठा साखळी, ग्राहक आणि इतर संबंधित व्यक्तींची ओळख पटवण्याच्या कामात गुंतले आहेत, जेणेकरून बनावट प्रीमियम मोबाईलची बेकायदेशीर असेंब्ली आणि विक्री करणारी संपूर्ण टोळी उद्ध्वस्त करता येईल.
