देशापेक्षा काहीही मोठे नाही!

सरसंघचालक मोहनजी भागवतांशी झालेल्या संवादाची आठवण

देशापेक्षा काहीही मोठे नाही!

विवान कारूळकर

वयाच्या १५ व्या वर्षी जेव्हा मी ‘नियर अर्थ ऑब्जेक्ट्स’च्या (लघुग्रह शोधण्याच्या) तंत्रज्ञानावर पेटंटवर काम सुरू केले. द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल सायन्स, द सनातन धर्म: ट्रू सोर्स ऑफ ऑल तंत्रज्ञान, इलोन मस्क: द मॅन हु बेंड्स रिॲलिटी ही तीन पुस्तके लिहिली. माझ्या दुसऱ्या पुस्तकाचे प्रकाशन पूजनीय सरसंघचालक मोहनराव भागवत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली.

अलिकडेच मोहनजींनी जेन झी ही देशविरोधी नसून ज्वलंत राष्ट्रवादी आहे. त्यांच्याशी संवादाची गरज आहे, असे वक्तव्य केले तेव्हा मला त्यांच्यासोबत झालेल्या संवादाची आठवण झाली. १५ नोव्हेंबर २०२४ रोजी ही भेट झाली होती. इस्रोचे माजी अध्यक्ष एस. सोमनाथ आणि नोबेल विजेते कैलास सत्यार्थी यांच्यासोबत स्टेज शेअर करण्याची आणि संवाद साधण्याची संधी मिळाली.

मला आठवते मी सरसंघचालकांशी अर्धा तास त्यांच्यासोबत बोललो होतो. मी एका खूप मोठ्या व्यक्तिशी बोलतोय याची मला तेव्हाही कल्पना होती, परंतु त्यांच्या वागण्यात बडेजाव नव्हता वडीलकीची झांक होती.

माझे विचार माझ्या वाचनातून सिद्ध झाले आहेत. मला प्रश्न पडतात, मी त्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतो. विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ही पाश्चात्य जगाची मक्तेदारी आहे, असे मलाही वाटायचे. परंतु मी वेदांचा आणि प्राचीन ग्रंथांचा अभ्यास केला, तेव्हा माझ्या लक्षात आले की ज्या भौतिकशास्त्रीय आणि गणिताच्या सिद्धांतांचे श्रेय पश्चिमेला दिले जाते, त्यांची मुळे आपल्या सनातन परंपरेत हजारो वर्षांपूर्वीच रोवली गेली होती. मला खेदाने असे म्हणावे लागले की, याबाबत माझ्या वयाच्या अनेकांना याबाबत माहिती नाही, त्याबाबत जाणून घेण्याची इच्छा नाही.

हे ही वाचा:

महाकाल दर्शनाहून परतताना भीषण अपघात; ६ भाविकांचा मृत्यू

भारतीय संघाला दिलासा, शुभमन गिलने सुरू केला सराव

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर चिखल-बूटफेक?

चाकरमान्यांनो खुशाल जावा; आपल्या गावा

आपण आपल्या सांस्कृतिक आणि वैज्ञानिक वारशाचा न्यूनगंड बाळगणे बंद केले पाहिजे. विज्ञान आणि सनातन धर्म हे एकमेकांच्या विरोधात नसून, एकमेकांना पूरक आहेत, हे कायम लक्षात ठेवले पाहीजे. कोणत्याही गोष्टीवर डोळे झाकून विश्वास ठेवण्याचा माझाही स्वभाव नाही. मीही प्रत्येक गोष्टीच्या मूळाशी जातो. प्रश्न विचारतो आणि खातरजमा करतो. मी जेव्हा ‘द सनातन धर्म’ वरील पुस्तके लिहिली, तेव्हा मी केवळ धार्मिक भावना म्हणून नव्हे, तर विज्ञानाच्या आणि तंत्रज्ञानाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट कसून पाहीली.

इलोन मस्क यांच्यावर पुस्तक लिहिले, तेव्हा मला हेच जाणवले की, आधुनिक जगातील सर्वात मोठे इनोव्हेटर्ससुद्धा याच विचारसरणीचा वापर करून जग बदलत आहेत.

गुरुग्राममध्ये मोहनजी मला म्हणाले होते, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेच्या पलीकडे जाऊन राष्ट्रहिताचा विचार व्हायला हवा. तुमचे ध्येय जितके मोठे असेल, तितकेच तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजेत.

माझ्या पिढीला (Gen Z) बऱ्याचदा फक्त रील्स स्क्रोल करणारी किंवा डिजिटल जगात हरवलेली पिढी समजले जाते. पण हे खरे नाही. माझ्या वयाची मुलं कधी नव्हे इतकी करीयर बाबत गंभीर आहेत. राष्ट्रकूल स्पर्धेत पदके मिळवणाऱ्या भारतीयांचे वय पंचवीशीचे आहे. अर्थात माझ्या वयापासून किंवा त्या आधीपासून ते मेहनत घेत असणार. करीयर घडवताना देशाबद्दल जाणून घेणे, आपला समृद्ध वारसा समजून घेणे आणि तो अधिक समृद्ध करणे मला आवडेल. किमान मी पूर्ण शक्तीने तसा प्रयत्न करेन. देशासमोर समस्या आहेत, त्या सोडविण्यासाठी संघर्ष करेन.

नवीन भारताची संकल्पना (Vision for New Bharat):”Gen Z म्हणून आपल्याला केवळ सोशल मीडियावर रिल्स स्क्रोल करायच्या नाहीत, तर अंतराळ संशोधन, क्वांटम तंत्रज्ञान आणि राष्ट्राच्या बौद्धिक पुनरुत्थानात योगदान द्यायचे आहे. प्राचीन अध्यात्म आणि आधुनिक विज्ञान यांचा मिलाफ हाच भारताला जागतिक स्तरावर पुन्हा ‘विश्वगुरू’ बनवण्याचा मार्ग आहे.”

Exit mobile version