देहरादूनमधील कॅम्पसमध्ये अडकलेल्या २०० विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

देहरादूनमधील कॅम्पसमध्ये अडकलेल्या २०० विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका

उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच काही विद्यार्थी अडकून पडल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आपत्ती प्रतिसाद कर्मचाऱ्यांनी या सर्व विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका केली आहे.

उत्तराखंडमधील देहरादून येथील पौंडा भागात असलेल्या देवभूमी इन्स्टिट्यूट कॅम्पसमध्ये रात्रीच्या मुसळधार पावसामुळे पाणी साचल्याने अडकलेल्या विद्यार्थ्यांना आपत्ती प्रतिसाद कर्मचाऱ्यांनी वाचवले. राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे रस्ते, घरे आणि इतर पायाभूत सुविधांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. या संस्थेत २०० विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळताच, राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) कॉर्म्सच्या बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी बाहेर काढले.

“टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी जलद बचाव कार्य हाती घेतले. पाणी साचण्याच्या दरम्यान, टीमने अत्यंत तत्परतेने काम केले आणि सर्व २०० विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढले. तसेच त्यांना सुरक्षित ठिकाणी नेले,” असे एसडीआरएफने म्हटले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी मंगळवार, १६ सप्टेंबर रोजी सहस्त्रधारा, रायपूर आणि देहरादूनमधील इतर भागांसह मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मुख्यमंत्र्यांनी मालदेवता येथील केसरवाला परिसराचीही पाहणी केली. देहरादून जिल्ह्यातील सहस्त्रधारा भागात मुसळधार पावसामुळे आलेल्या पाण्याच्या प्रवाहात १०० मीटर लांबीचा रस्ता वाहून गेला होता.

हे ही वाचा : 

ऑनलाइन बेटिंग ऍप प्रकरणी माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यांना समन्स

देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींची पहिली भेट कशी होती?

… म्हणून ट्रम्प ‘न्यू यॉर्क टाईम्स’वर मानहानीचा खटला दाखल करणार!

आसाम सिव्हिल सर्व्हिसमधील महिला अधिकाऱ्याच्या घरावर छापे

पत्रकारांना संबोधित करताना धामी म्हणाले, “घरांचे आणि सरकारी मालमत्तेचे खूप नुकसान झाले आहे. जनजीवन प्रभावित झाले आहे. आम्ही गोष्टी पुन्हा रुळावर आणण्यासाठी काम करत आहोत. अनेक ठिकाणी संपर्क तुटला आहे. नद्यांची पाण्याची पातळी वाढली आहे. आमचे सर्व विभाग युद्धपातळीवर काम करत आहेत. पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही सकाळी माझ्याशी बोलून सर्व माहिती घेतली आहे तसेच त्यांनी आम्हाला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. या आपत्तीत बाधित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी आम्ही काम करत आहोत.”

Exit mobile version