ख्वाजा आ जा… स्मिथ जा जा…

ख्वाजा आ जा… स्मिथ जा जा…

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील अ‍ॅशेस मालिकेतील तिसरा कसोटी सामना बुधवारी एडिलेड येथे सुरू झाला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र सामन्याच्या सुरुवातीलाच ऑस्ट्रेलियन संघात मोठा बदल पाहायला मिळाला.

एडिलेड कसोटीच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये उस्मान ख्वाजा याची अचानक एन्ट्री झाली, तर स्टार फलंदाज स्टीव स्मिथ सामन्याबाहेर गेला. आधी जाहीर केलेल्या संघात ख्वाजाचे नाव नव्हते. मात्र सामन्याच्या अगदी आधी स्मिथला चक्कर येण्याची तक्रार झाल्यामुळे त्याला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आले. याचा थेट फायदा ख्वाजाला झाला.

३९ वर्षांचा उस्मान ख्वाजा गुरुवारी आपला वाढदिवस साजरा करणार असून, या वयात ऑस्ट्रेलियासाठी कसोटी सामना खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे. ख्वाजाला या सामन्यात डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली नाही. तो चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरला.

ऑस्ट्रेलियाची सुरुवात एडिलेड कसोटीत निराशाजनक झाली. संघाने ९४ धावांत ४ विकेट्स गमावल्या. मात्र ख्वाजाने मिळालेल्या संधीचे सोने करत संयमी आणि आत्मविश्वासपूर्ण खेळी साकारली. त्याने शानदार अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरला. बातमी लिहेपर्यंत ख्वाजा ५१ धावांवर नाबाद खेळत होता.

वयामुळे ख्वाजाचा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीचा शेवट जवळ आल्याची चर्चा होती. मात्र एडिलेड कसोटीत मिळालेली संधी आणि त्यावर केलेली अर्धशतकी खेळी ही त्याच्या कारकिर्दीसाठी नवी संजीवनी ठरली आहे. या खेळीच्या जोरावर ख्वाजाने किमान अ‍ॅशेस मालिकेतील उर्वरित सामन्यांसाठी आपली दावेदारी मजबूत केली आहे.

Exit mobile version