राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचे बुधवार, २८ जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले. राज्यभरात या वृत्तानंतर शोक व्यक्त केला जात असतानाच अजित पवार यांच्या पार्थिवावर उद्या (गुरुवार, २९ जानेवारी) त्यांच्या कर्मभूमीत म्हणजेच बारामती येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह देखील बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवार, २९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर आणले जाणार आहे. यापूर्वीच मैदान परिसरात कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे. अंत्यसंस्कारावेळी अजित पवारांना ‘गार्ड ऑफ ऑनर’ देऊन मानवंदना दिली जाणार आहे. बारातमीमध्ये उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रभर शोककळा पसरली असून आज (२८ जानेवारी) राज्यात शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच अधिकृतरीत्या राज्यभर तीन दिवसांचा दुखवटा घोषित करण्यात आला आहे. पुणे महापालिका आयुक्तांच्या आदेशानुसार आज (दि.२८ जानेवारी) आणि उद्या (दि.२९ जानेवारी) पुणे शहर बंद ठेवण्यात येणार असून, उद्या मार्केटयार्डही बंद राहणार आहे.
हे ही वाचा:
८.४३ वाजता विमान उतरवण्याला परवानगी आणि ८.४४ वाजता दिसल्या आगीच्या ज्वाळा
अजित पवारांच्या विमानाचा अपघात; प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम
“मोठा भाऊ गेला… अजित पवारांच्या जाण्याने महाराष्ट्राचं मोठं नुकसान”
“दमदार आणि दिलदार मित्र सोडून गेला…”
अजित पवार यांचे राज्यातील असो किंवा केंद्रातील, प्रत्येक नेत्यांशी त्यांचे जवळचे आणि चांगले नाते होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच नेते मंडळींसह कार्यकर्त्यांना अश्रु अनावर झाले. अनेकांनी समाजमाध्यमांवर पोस्ट शेअर करून दु:ख व्यक्त केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शोक व्यक्त केला. त्यांनी शरद पवार यांना सांत्वनपर फोन देखील केला होता.
