हम तुम जुदा ना होंगे…अलविदा धर्मेंद्र

हम तुम जुदा ना होंगे…अलविदा धर्मेंद्र

 

गेली सहा दशके चित्रपटसृष्टीवर आपल्या रांगड्या अभिनयाची छाप पाडणारे, रोमॅंटिक ते ऍक्शन हिरो असा प्रदीर्घ प्रवास करणारे धर्मेंद्र यांचे निधन सोमवारी झाले. १९६०मध्ये चित्रपटसृष्टीत पहिले पाऊल टाकल्यानंतर धर्मेंद्र यांची कारकीर्द हळूहळू बहरत गेली आणि स्वतःच्या अभिनयाची, संवादफेकीची, ऍक्शनपटांची एक छाप धर्मेंद्र यांनी सोडली.

३०० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये अभिनयाचा ठसा उमटवणारे ‘ही-मॅन’, जे प्रेक्षकांना नेहमी सांगत, “गर तुम भूला ना दोगे, सपने ये सच ही होंगे, हम तुम जुदा ना होंगे,” पण आपल्या ९० व्या वाढदिवसाच्या आधीच, आठवणींचा मोठा खजिना मागे ठेवून महान अभिनेता धर्मेंद्र निघून गेले.

८९व्या वयातही त्यांच्या चेहऱ्याची ती चमक तशीच होती. दोन पत्नी, सहा मुलं आणि १३ नातवंडं असा त्यांचा भलामोठा परिवार होता.  अवघ्या १९ व्या वर्षी त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केलं होतं—तेव्हा त्यांनी सिनेमात पाऊलसुद्धा ठेवले नव्हते. या लग्नातून त्यांना चार मुले झाली—सनी देओल, बॉबी देओल आणि दोन मुली विजेता व अजीता.

धर्मेंद्र लोकप्रिय झाले तसे त्यांची कीर्तीही वाढली. ७० च्या दशकापर्यंत ते हिंदी सिनेमा क्षेत्रातील सर्वोत्तम अभिनेत्यांपैकी एक मानले जाऊ लागले. आणि मग आला ‘शोले’ हा चित्रपट. या चित्रपटात त्यांच्या सोबत हेमा मालिनी पडद्यावर दिसल्या आणि नंतर दोघांनी लग्न केल्याची बातमी आली. अनेक अफवा पसरल्या की प्रकाश कौर यांनी घटस्फोट न दिल्याने धर्मेंद्र यांनी इस्लाम धर्म स्वीकारला. मात्र, २००४ मध्ये धर्मेंद्र यांनी या सगळ्या अफवा नाकारल्या.

हे ही वाचा:

लाचित बोर्फुकन यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून श्रद्धांजली

हिंदी चित्रपटसृष्टीचा रांगडा अभिनेता धर्मेंद्र कालवश

पाच वर्षांच्या साईशा देवलची मल्लखांब स्पर्धेत सोनेरी चमक

“सिंध भारतात परत येऊ शकतो, सीमा बदलू शकतात”

वृद्धापकाळात त्यांचं घर १३ नातवंडांनी भरून गेलं. सनी व बॉबीचे मुलगे, विजेता व अजीता यांच्या मुलं-मुली, ईशाच्या दोन मुली आणि अहानाची तीन मुलं.

८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये जन्मलेले धर्मेंद्र एका जाट कुटुंबात वाढले. त्यांच्या अभिनयासोबतच २०१२ मध्ये त्यांना पद्मभूषण प्रदान करण्यात आला. २००४ मध्ये त्यांनी भाजपाच्या तिकिटावर बीकानेरमधून निवडणूक जिंकून लोकसभेतही प्रवेश केला.

धर्मेंद्र यांची जोडी जवळजवळ प्रत्येक अभिनेत्रीबरोबर लोकप्रिय होती, परंतु हेमा मालिनी यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष आवडती होती. दोघांनी २८ चित्रपटांत एकत्र काम केले.

धर्मेंद्र यांनी ‘बेताब’, ‘घायल’ आणि ‘घातक’ या तीन सुपरहिट चित्रपटांचे निर्मिती केली. त्याच काळात हेमाच्या दिग्दर्शनातील तीन चित्रपट मात्र प्रेक्षकांनी नाकारले. धर्मेंद्र यांनी फिल्मफेअर टॅलेंट कॉन्टेस्ट (१९५८) पासून संघर्षाची सुरुवात केली आणि १९६०मध्ये ‘दिल भी तेरा हम भी तेरे’ मधून पदार्पण केले. त्यांचा पहिला सोलो हिरो चित्रपट ‘फूल और पत्थर’ (१९६६) होता, ज्यासाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. ७०च्या दशकात ते जगातील सर्वात देखण्या पुरुषांपैकी एक म्हणून निवडले गेले आणि त्यांना ‘वर्ल्ड आयर्न मॅन’ ही पदवी मिळाली.

१९७५ मध्ये आलेला ‘शोले’ तर प्रसिद्धच, पण त्याच वर्षी ‘प्रतिज्ञा’मधील ‘मैं जट यमला पगला दीवाना’ या गाण्याने त्यांना ‘गरम धरम’ ही उपाधी मिळाली. राजेश खन्नाला टक्कर देणारा एकमेव स्टार म्हणूनही धर्मेंद्र ओळखले जायचे. ‘जीवन मृत्यु’, ‘प्रतिज्ञा’, ‘लोफर’, ‘धर्मवीर’, ‘यादों की बारात’ यांसारख्या अनेक सुपरहिट फिल्म्स त्यांनी दिल्या.

साल २०२५ मध्ये येणाऱ्या त्यांच्या ‘इक्कीस’ या चित्रपटातून ते पुन्हा पडद्यावर येणार होते. परंतु त्याआधीच, ‘ही-मॅन’ आपल्या चाहत्यांना कायमची आठवण देऊन निघून गेले.

Exit mobile version