आशिया कप: भारताच्या विजयानंतर मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची करून दिली आठवण

राजकीय नेत्यांकडून भारतीय संघाला खास शैलीत शुभेच्छा

आशिया कप: भारताच्या विजयानंतर मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची करून दिली आठवण

रविवारी रंगलेल्या आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानवर पाच विकेटने विजय मिळवला. यंदाच्या आशिया कप स्पर्धेला काहीसा राजकीय रंग चढल्याचे पाहायला मिळाले होते. मैदानावरीलही अनेक प्रसंगांमुळे यंदाची स्पर्धा विशेष चर्चेची ठरली होती. विशेषतः भारत आणि पाकिस्तानमधील झालेले तीन सामने हे चर्चेचा विषय झाले होते. त्यामुळे अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला नमवून मिळालेला विजय हा खास मानला जात आहे. भारतीय क्रिकेट संघावर देशभरातून कौतुकाचा वर्षाव होत असताना राजकीय नेत्यांनीही या विजयाबद्दल संघाचे कौतुक केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाच्या विजयाचे अभिनंदन करताना खास शैली वापरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. नरेंद्र मोदी यांनी दुबईमध्ये झालेल्या आशिया कप स्पर्धेची आणि भारतीय लष्कराच्या अलिकडच्या सीमेपलीकडील मोहिमेची तुलना केली आहे. भारतीय संघाचे अभिनंदन करतानाचं त्यांनी पाकिस्तानलाही चिमटा काढला आहे.

नरेंद्र मोदी यांनी पोस्ट करत म्हटले आहे की, “खेळाच्या मैदानावर ऑपरेशन सिंदूर. निकाल एकच आहे. भारत जिंकला! आपल्या क्रिकेटपटूंचे अभिनंदन,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानलाही त्यांनी चिमटा काढला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही म्हटले आहे की, “एक अभूतपूर्व विजय. संघाच्या तीव्र ऊर्जेने पुन्हा एकदा प्रतिस्पर्ध्यांना मात दिली. भारत कोणत्याही क्षेत्रात असला तरी जिंकणारच आहे.” असे म्हणत त्यांनीही पाकिस्तानला टोला लगावला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही क्रिकेटपटूंचे अभिनंदन केले आणि भारताने स्पर्धेत एकही सामना गमावला नाही आणि त्यामुळे त्याचे वर्चस्व कायम राहिले हे अधोरेखित केले. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी या विजयाचे कौतुक केले आणि “नव्या भारताने कामगिरी केली” याचा पुरावा म्हणून कौतुक केले.

हे ही वाचा:

भारताचे ऑपरेशन सिंदूरनंतर ऑपरेशन ‘तिलक’

कंप्यूटर आणि मोबाईलमुळे वाढतेय सर्व्हायकल पेनची समस्या

‘भारताला स्वाभिमान आहे’

भारताची प्रवासी वाहन विक्री दोन टक्क्यांनी वाढणार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ७ मे २०२५ रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकीस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ उध्वस्त केले. भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने अचूकता आणि समन्वयाने संयुक्त मोहीम राबवली. त्यानंतर झालेली आशिया कप स्पर्धा चर्चेचा विषय बनली. संपूर्ण स्पर्धेत भारताने वर्चस्व राखत पाकिस्तानचा तीन सामन्यांमध्ये पराभव केला. आशिया कपच्या अंतिम सामन्यात भारताने तिलक वर्माच्या नाबाद ६९ धावांच्या खेळीच्या जोरावर आणि कुलदीप यादवच्या स्पेलच्या जोरावर विजय मिळवला.

Exit mobile version