भारतीय क्रिकेट संघाला साउथ आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० मालिकेत मोठा धक्का बसला आहे. संघाचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल आजारपणामुळे मालिकेतील उर्वरित दोन सामन्यांतून बाहेर पडला आहे. सध्या अक्षर लखनऊमध्ये संघासोबत असून, त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.
पुरुष निवड समितीने लखनऊ आणि अहमदाबाद येथे होणाऱ्या टी-२० सामन्यांसाठी शाहबाज अहमद याची अक्षर पटेलच्या जागी संघात निवड केली आहे.
साउथ आफ्रिकेविरुद्ध कटक येथे झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारताने १०१ धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने ६ विकेट्स गमावत १७५ धावा केल्या होत्या, त्यानंतर पाहुण्या संघाला अवघ्या १२.३ षटकांत ७४ धावांत गुंडाळले.
मात्र दुसऱ्या सामन्यात साउथ आफ्रिकेने २० षटकांत ४ विकेट्स गमावत २१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ १९.१ षटकांत १६२ धावांत आटोपला आणि साउथ आफ्रिकेने सामना ५१ धावांनी जिंकत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
धर्मशाळा येथे झालेल्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने पुन्हा एकदा आपली ताकद दाखवत ७ विकेट्सने विजय मिळवला. साउथ आफ्रिकेला ११७ धावांत बाद केल्यानंतर भारताने १५.५ षटकांत लक्ष्य गाठत मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली.
टेस्ट मालिकेत ०-२ ने पराभव पत्करल्यानंतर भारताने साउथ आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका २-१ ने जिंकली होती. आता भारतीय संघाचे संपूर्ण लक्ष टी-२० मालिकेतील उर्वरित सामन्यांवर आहे.
भारत आणि साउथ आफ्रिका यांच्यातील चौथा टी-२० सामना १७ डिसेंबर रोजी लखनऊमध्ये, तर अंतिम सामना १९ डिसेंबर रोजी अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार आहे.
अंतिम दोन सामन्यांसाठी भारतीय संघ :
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद.
