हिंदवी स्वराज्याचे जाणते राजा: शिवनेरी किल्ल्यावर ३९६ व्या शिवजयंतीचा उत्साह

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची शिवनेरी किल्ल्यावर उपस्थिती

हिंदवी स्वराज्याचे जाणते राजा: शिवनेरी किल्ल्यावर ३९६ व्या शिवजयंतीचा उत्साह

देशभरात आज (१९ फेब्रुवारी) ३९६ वी शिवजयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी होत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरातील शिवभक्तांनी ऐतिहासिक गड-किल्ल्यांवर मोठी गर्दी केली आहे. विशेषतः महाराजांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथे पहाटेपासूनच भक्तांची रांग लागली होती.

शिवनेरीवर जल्लोषात जन्मोत्सव सोहळा

शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवनेरी किल्ल्यावरील शिवजन्म स्थळ आणि शिवकुंज इमारत आकर्षक फुलांनी सजविण्यात आली होती. संपूर्ण परिसर भगव्या पताकांनी आणि विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता. पाळणा झुलवण्याचा पारंपरिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. महाराजांना शासकीय मानवंदना देण्यात आली.

या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार म्हणून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीत झालेल्या सोहळ्याने कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले. लहान मुलांनी मावळ्यांच्या वेशभूषेत लेझीम, पारंपरिक वादन आणि साहसी खेळांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महाराजांना अभिवादन केले.

साताऱ्यात मशालींच्या प्रकाशात उजळला अजिंक्यतारा

दरम्यान, सातारा येथे शिवजयंतीचा उत्सव दोन दिवस आधीपासूनच रंगला होता. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किल्ले अजिंक्यतारा येथे शेकडो मशाली प्रज्वलित करून किल्ला प्रकाशमय करण्यात आला. शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात गडपूजनाने झाली.

पारंपरिक वाद्यांच्या गजरात, हातात मशाली घेतलेले शेकडो मावळे आणि नागरिक बुरुजांवर उभे राहिले होते. मशालींच्या तेजस्वी प्रकाशात आणि आकर्षक विद्युत रोषणाईत अजिंक्यतारा किल्ला अक्षरशः उजळून निघाला होता. या दृश्याने उपस्थितांमध्ये अभिमान आणि प्रेरणेची भावना जागृत झाली.

हे ही वाचा:

भारतात होणार ‘हॅमर’ क्षेपणास्त्रांचे उत्पादन!

मुंबई महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्षपदासाठी प्रभाकर शिंदेंची निवड

घरगुती काम करणारे मिळतील आता एका क्लिकवर

वडाळ्यात होणार राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग

शिवभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

राज्यभरात विविध ठिकाणी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ऐतिहासिक देखावे सादर करण्यात येत आहेत. शिवजयंती केवळ उत्सव नसून, ती स्वराज्य, शौर्य आणि प्रेरणेचा संदेश देणारी पर्वणी असल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांनी संपूर्ण वातावरण दुमदुमून गेले असून, शिवजयंतीचा हा सोहळा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि अभिमानाचा साक्षीदार ठरत आहे.

Exit mobile version