मराठा आरक्षण आंदोलनामुळे मुंबई ठप्प झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने मनोज जरांगे यांना फटकारत मंगळवारी दुपारपर्यंत रस्ते रिकामे करण्याचे आदेश दिले. यानंतर आता मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांनी देखील नोटीस बजावली आहे. आंदोलनासाठी घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा उल्लेख करून पोलिसांनी जरांगे आणि त्यांच्या कोअर कमिटीला आझाद मैदान खाली करण्याची नोटीस बजावली आहे.
मनोज जरांगे यांचा आंदोलनाचा आजचा पाचवा दिवस आहे. या आंदोलनाला आता पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलसांनी त्यांना नोटीस बजावून लवकरात-लवकर आझाद मैदान खाली करण्यास सांगितले आहे. तसेच कोर्टाने मनोज जरांगे यांना फटकारल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिका (बीएमसी) सक्रिय झाली. सोमवारी (१ सप्टेंबर) रात्री बीएमसीने आझाद मैदान परिसराची “खोल साफसफाई” केली. “आझाद मैदानाबाहेरील रस्त्यांची खोल साफसफाई पूर्ण झाली आहे,” असे नागरी संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे.
घनकचरा व्यवस्थापन विभागाने कचरा साफ करण्यासाठी आणि सामान्य परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी एक स्किड स्टीयर लोडर (बॉबकॅट), दोन मिनी कॉम्पॅक्टर आणि एक मोठा कॉम्पॅक्टर तैनात केला. बीएमसीचे कर्मचारी देखील यांत्रिक ऑपरेशनमध्ये सामील झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरी संस्थेने सांगितले की ते परिसर स्वच्छ करण्यासाठी आणि जनतेसाठी पुन्हा उघडण्यासाठी प्रयत्न करत राहतील.
हे ही वाचा :
सुप्रिया सुळेंच्या गाडीवर आंदोलकांनी का भिरकावल्या बाटल्या ?
मनोज जरांगेंचे नरेटिव्ह… सुप्रिया सुळेंचा सोपा मार्ग |
हत्ती-ड्रॅगनच्या भेटीने ट्रम्प तात्यांची वाजली पुंगी !
हाय ब्लड प्रेशरच्या रुग्णांमध्ये प्रभावी ठरत आहे हे नवीन औषध
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनादरम्यान मनोज जरांगे यांनी न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार घालून दिलेल्या अटींचे उल्लंघन केले. या उल्लंघनांमध्ये ट्रक, कार आणि निदर्शकांच्या माध्यमातून सार्वजनिक रस्ते अडवणे यांचा समावेश होता. या पार्श्वभूमीवर, त्यांच्या सार्वजनिक विधानांची आणि झालेल्या उल्लंघनांची गंभीर दखल घेत, त्यांना संबंधित कायद्यानुसार नोटीस बजावण्यात आली आहे.
“अटींचा भंग झालाय का, ते न्यायालयात मांडणार आहोत” – वकील आशिष गायकवाड
मराठा आरक्षण कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांना मुंबई पोलिसांकडून दिलेल्या नोटीसबाबत त्यांच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. वकील आशिष गायकवाड म्हणाले, “नोटीसमध्ये काही नियमांचे उल्लंघन झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात खरोखर उल्लंघन झाले आहे का?, हे आम्ही न्यायालयात सादर करू. मनोज जरांगे पाटील काल आणि परवा थोडेसे अस्वस्थ होते. आज आम्ही त्यांची बाजू जाणून घेण्यासाठी येथे आलो आहोत.” ते पुढे म्हणाले, “लोक त्यांना सहकार्य करत आहेत. परिसरातील रस्ते आणि मैदान सुमारे ९५% रिकामे आहेत.”
