महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी ब्लाइंड टी-२० वर्ल्ड कप २०२५ चे विजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय महिला संघाची भेट घेतली. या वेळी त्यांनी खेळाडूंचे कौतुक करत राज्य सरकारकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“भारताचे नाव उज्ज्वल करणारा हा संघ आमच्यात उपस्थित आहे, याचा मला अत्यंत आनंद आहे. मी संघाचे मनापासून अभिनंदन करतो. या वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ अपराजित राहिला. संपूर्ण स्पर्धेत भारताने एकही सामना गमावला नाही. अंतिम सामना अवघ्या १२ षटकांत जिंकत भारताने ब्लाइंड क्रिकेटमधील आपले वर्चस्व सिद्ध केले.”
ते पुढे म्हणाले,
“या यशामागे प्रत्येक खेळाडूची वेगळी संघर्षकथा आहे. अनेक अडचणींवर मात करत खेळाडूंनी क्रिकेट सुरू ठेवले आणि आज हा ऐतिहासिक टप्पा गाठला. इतिहासातील पहिला ब्लाइंड महिला वर्ल्ड कप जिंकणारा देश म्हणून भारताचे नाव नोंदले गेले आहे.”
मुख्यमंत्री म्हणाले,
“महाराष्ट्र सरकार या खेळाडूंच्या अडचणी दूर करण्यासाठी पुढाकार घेईल. सरावासाठी मैदान उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. आपल्या या मुलींना सराव, सुविधा आणि कुटुंबीयांच्या पाठिंब्याच्या अनेक अडचणी असतात. कधी-कधी कुटुंबीयही खेळासाठी प्रोत्साहन देत नाहीत, त्यामुळे काही खेळाडू खेळ सोडतात. मात्र आता हे चित्र हळूहळू बदलत आहे आणि आपण सर्वजण मिळून ते बदलू.”
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर भारतीय संघाची कर्णधार दीपिका गावकर म्हणाल्या,
“मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या व्यस्त वेळापत्रकातून आम्हाला वेळ दिला, याबद्दल आम्ही आभारी आहोत. या भेटीत नोकरीबाबतही चर्चा झाली. असेच पाठबळ मिळाले, तर आम्ही देशाचे नाव आणखी उज्ज्वल करू. वर्ल्ड कप जिंकणे ही आमच्यासाठी मोठी कामगिरी आहे. त्या क्षणी आम्ही खूप भावूक झालो होतो. कठीण परिस्थितीतून वाट काढत मी या यशात योगदान दिले आहे. आज माझ्या पालकांना माझा अभिमान वाटतो.”
उपकर्णधार गंगा कदम म्हणाल्या,
“वर्ल्ड कप जिंकल्याचा आम्हाला प्रचंड आनंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील असून ८ वीपर्यंत शिक्षण घेतले आहे. शेतात काम केले आहे. आज क्रिकेटमुळे लोक मला ओळखतात. ‘क्रिकेट असोसिएशन फॉर द ब्लाइंड इन इंडिया’ आणि ‘समर्थनम ट्रस्ट फॉर द डिसेबल्ड’ यांचे मी मनापासून आभार मानते. सरकारी नोकरीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक आश्वासन दिले आहे.”
