१ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानात झालेल्या शक्तिशाली भूकंपात किमान १,४११ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि ३,१०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी मंगळवारी (२ सप्टेंबर) दिली. मुजाहिद यांनी एक्सवरील एका पोस्टमध्ये पुष्टी केली की भूकंपाच्या तीव्रतेमुळे ५,४०० हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली, ज्यामुळे सर्वाधिक नुकसान झालेल्या भागात हजारो कुटुंबे बेघर झाली. या भूकंपाची तीव्रता ६.० रिश्टर स्केल इतकी होती.
संपूर्ण गावे जमीनदोस्त झाली आहेत, बहुतेक मातीच्या विटा आणि लाकडापासून बनवलेल्या घरांच्या ढिगाऱ्याखाली लोक अडकले गेले. दुर्गम पर्वतीय भागात बचावकार्य सुरू आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकाऱ्याने या मोहिमेचे वर्णन “वेळेविरुद्धची शर्यत” (वेळेशी स्पर्धा ) असे केले आणि मृतांमध्ये मोठी वाढ होण्याचा इशारा दिला.
२०२१ मध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतरचा हा तिसरा मोठा भूकंप आहे. फक्त रशियाने मान्यता दिलेल्या तालिबान सरकारने आंतरराष्ट्रीय मदतीसाठी आवाहन केले आहे. मात्र, जागतिक संकटे, देणगीदार देशांचे घटते बजेट, तसेच महिला आणि मुलींवर टाकलेल्या निर्बंधांमुळे तालिबानच्या धोरणांना होत असलेला विरोध, विशेषतः आंतरराष्ट्रीय मदत गटांच्या कार्यावर घालण्यात आलेल्या बंदीमुळे अफगाणिस्तानकडे येणारी मदत मोठ्या प्रमाणावर घटली आहे.
हे ही वाचा :
मल्लिकार्जुन खर्गे यांनी राहुल गांधींची काळजी करावी
चंद्रशेखर राव यांची मुलगी कविता यांची पक्षातून हकालपट्टी!
कुख्यात गुन्हेगार अशद उर्फ अर्शदला अटक
भूस्खलनानं संपूर्ण गाव उद्ध्वस्त, १००० लोकांचा मृत्यू, केवळ एक जीवित!
दरम्यान, भारताने अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. भारत सरकारकडून १००० कुटुंबांसाठी तंबू (tents) पाठवण्यात आले आहेत. याशिवाय, १५ टन अन्नसामग्री तातडीने काबूलमधून कुनारपर्यंत पोहोचवली जात आहे. उद्यापासून आणखी मदतीचा माल भारतातून पाठवण्यात येणार असल्याचे भारत सरकारने सांगितले आहे.
