नाशिक जिल्ह्यातील मालसाणे (ता. चांदवड) येथील जैन धर्मियांच्या णमोकार तीर्थ विकासासाठी ३६ कोटी ३५ लाख रकमेच्या आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत मान्यता देण्यात आली. या आराखड्यांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांमुळे भाविकांना येथे आल्यानंतर अध्यात्मासोबतच तीर्थस्थळी येण्याचे आत्मिक समाधान मिळावे, अशा पद्धतीने कामे पूर्ण करावीत, असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, या ठिकाणी करण्यात येणारी कामे दर्जेदार असावी, कोणत्याही कामात तडजोड होऊ नये आणि विहित कालावधीत पूर्ण करावीत. या ठिकाणी ६ ते २५ फेब्रुवारी २०२६ दरम्यान आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कामांमध्ये स्थायी स्वरूपातील २४ कोटी २६ लाख आणि महोत्सवाच्या आयोजनासाठी १२ कोटी ९ लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, णमोकार तीर्थ येथे येणाऱ्या भाविकाला कुठल्याही अडचणींचा सामना करावा लागू नये. संबंधित यंत्रणांनी सर्व सोयीसुविधा भाविकांना उपलब्ध करून द्याव्यात. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांना येथील अनुभव आत्मिक समाधान देईल अशा पद्धतीने महोत्सव आयोजित करावा. स्वच्छतेसाठी असलेली कामे प्राधान्याने पूर्ण करावी. पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करून पाणीपुरवठा नियमित करावा.
हेही वाचा..
ओडिशात वनरक्षकांसाठी १२ कोटींची ‘थार’
अमेरिका-भारत व्यापार करार आवश्यक
राहुल गांधींकडे ना जनमत, ना संगत, ना जनपथचा पाठिंबा
धमकीचा बॅनर लावून बांगलादेशात हिंदू कुटुंबाचे घर जाळले!
तीर्थाच्या विकासातून स्थानिक रोजगार निर्माण होणार आहे. हे ठिकाण जैन धर्मियांचे राज्यातच नव्हे, तर देशात एक धार्मिक केंद्र म्हणून उदयास येईल. आंतरराष्ट्रीय पंचकल्याण प्रतिष्ठान महोत्सवासाठी देशभरातून १० ते १५ लाख भाविक येण्याची अपेक्षा आहे. बैठकीत नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे सादरीकरण केले. यावेळी अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (सार्वजनिक बांधकाम) मनीषा म्हैसकर, सचिव (नियोजन) शैला ए, नाशिक विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हा नियोजन अधिकारी विजय शिंदे, णमोकार तीर्थचे पदाधिकारी उपस्थित होते.
थोडक्यात णमोकार तीर्थ विकास आराखडा
स्थान: मालसाणे, नाशिक-धुळे महामार्गाजवळ, ४० एकरआराखडा अंतर्गत कामे: क्राँकिट रस्ता तयार करणे संरक्षक भिंत बांधकाम, नौकायन बांधकाम, हेलिपॅड, पार्किंग व्यवस्था, वीज पुरवठा, स्वच्छतेसाठी कामे. महोत्सवासाठी (६-२५ फेब्रुवारी २०२६): पाण्याच्या टाक्या बसविणे, ४५० युनिट टॉयलेट ब्लॉक उभारणी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही, नियंत्रण कक्ष, तात्पुरती वैद्यकीय युनिट स्थापना. या आराखड्याची एकूण किंमत: ३६ कोटी ३५ लाख. स्थायी कामे: २४ कोटी २६ लाख, महोत्सव आयोजनासाठी कामे: १२ कोटी ९ लाख.
