‘धुरंधर: द रिव्हेंज’ रिलीजपूर्वीच सुपरहिट! ३७५ कोटींची कमाई

नॉन- थिएट्रिकल हक्क आणि जागतिक आगाऊ तिकीट विक्रीमधील प्री-रिलीज व्हॅल्युएशन

‘धुरंधर: द रिव्हेंज’ रिलीजपूर्वीच सुपरहिट! ३७५ कोटींची कमाई

रणवीर सिंगची मुख्य भूमिका असलेला आणि दिग्दर्शक आदित्य धर यांनी दिग्दर्शन केलेला “धुरंधर: द रिव्हेंज” हा चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवर ऐतिहासिक सुरुवात करण्यासाठी सज्ज झाला आहे. १९ मार्च २०२६ रोजी प्रदर्शित होण्यापूर्वीच ‘धुरंधर: द रिवेंज’ या चित्रपटाने जगभरात सुमारे ३७५ कोटी रुपयांचे प्री-रिलीज व्हॅल्युएशन गाठले आहे. या आकड्यात नॉन- थिएट्रिकल हक्कांमधून मिळालेली कमाई आणि जागतिक आगाऊ तिकीट विक्री यांचा समावेश आहे.

सॅकनिल्क या वेबसाइटनुसार, आदित्य धरच्या या चित्रपटाने प्रीमियर आणि पहिल्या दिवसाच्या बुकिंगमधून (ब्लॉक केलेल्या जागांसहित) आधीच १३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. अजून काही शोजसाठी बुकिंग सुरू व्हायचे असल्याने, चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी पुढील दोन दिवसांत हा आकडा मोठ्या प्रमाणात वाढण्याची अपेक्षा आहे. तर, नॉन-थिएट्रिकल हक्क यामधून २४५ कोटी रुपयांची कमाई केलेली आहे.

‘धुरंधर २’ हा सिनेमा १९ मार्च रोजी प्रदर्शित होणार असला तरी, देशभरात १८ मार्च रोजी त्याचे प्रिव्ह्यू किंवा प्रीमियर शो आयोजित करण्यात आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या शोमधून चित्रपटाने मोठी कमाई केली आहे. पहिल्याच दिवशी (१९ मार्च), चित्रपटाने भारतातील १३,००० शोजमधून २४.५० कोटी रुपयांची देशांतर्गत कमाई नोंदवली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील आगाऊ विक्री आता अंदाजे ६० कोटी रुपयांवर पोहोचली असून, त्यामुळे जागतिक स्तरावर आगाऊ विक्रीचा एकूण आकडा १३० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

‘धुरंधर २’ची आतापर्यंतची कमाई

नॉन-थिएट्रिकल हक्क- २४५ कोटी रुपये

आगाऊ तिकीट विक्री- १३० कोटी रुपये

दिग्दर्शक आदित्य धर यांच्या ;धुरंधर: द रिव्हेंज’ या चित्रपटाचा कालावधी तीन तास ५५ मिनिटे आहे. मुंबई, पुणे आणि अहमदाबादसारख्या शहरांमध्ये पहाटे २ वाजल्यापासून शो आयोजित करण्यात आल्याचे वृत्त आहे. मुंबईत, मुव्हीमॅक्स सायन आणि ठाण्यातील मुव्हीमॅक्स वंडर मॉलने पहाटे २:१५ आणि ५:३० वाजताचे शो जाहीर केले आहेत. जवळपास चार तासांच्या या चित्रपटाला सामावून घेण्यासाठी आणखी अनेक चित्रपटगृहे याच मार्गाचा अवलंब करतील अशी अपेक्षा आहे.

‘धुरंधर: द रिव्हेंज’साठी, चाहत्यांचा उत्साह आणि तिकिटांची मागणी पाहता चित्रपटगृह मालक २४ तास शो कसे ठेवता येतील यासाठी योजना आखत असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये प्रदर्शित होईल. रणवीर सिंग व्यतिरिक्त, या चित्रपटात अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन, राकेश बेदी, मानव गोहिल, गौरव गेरा आणि इतर अनेक कलाकार आहेत.

Exit mobile version