उधमपूरमध्ये चकमक सुरू; जैशचे दहशतवादी असल्याची माहिती

चकमकीत एक लष्करी जवान जखमी

उधमपूरमध्ये चकमक सुरू; जैशचे दहशतवादी असल्याची माहिती

जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे दहशतवादी आणि सुरक्षा दल यांच्यात चकमक सुरू असून काही दहशतवादी घेरले गेल्याची माहिती आहे. तसेच दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत एक लष्करी जवान जखमी झाला आहे. सध्या परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे.

उधमपूरमध्ये अडकलेले दहशतवादी जैश-ए-मोहम्मदशी संबंधित असल्याचे मानले जात आहे. वृत्तानुसार, उधमपूरमधील दुडू बसंतगडमध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली. शोध मोहीम सुरू करण्यात आली. लष्कराच्या विशेष ऑपरेशन ग्रुप आणि पोलिसांनी एकत्रितपणे ही मोहीम सुरू केली. त्यानंतर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यामध्ये एक लष्करी जवान जखमी झाला. तीन ते चार दहशतवादी अडकल्याची माहिती समोर आली आहे.

व्हाईट नाईट कॉर्प्सने म्हटले आहे की, दोडा- उधमपूर सीमेवर गोळीबार सुरू आहे. दहशतवाद्यांशी संपर्क झाला आहे. कारवाई अजूनही सुरूच आहे. या गोळीबारात एक लष्करी जवान जखमी झाला. गेल्या एका वर्षात या भागात अनेक गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. २६ जून रोजी दुडू- बसंतगड जंगलात झालेल्या चकमकीत ठार झालेला दहशतवादी हैदर हा जैश-ए-मोहम्मदचा एक टॉप कमांडर होता, जो गेल्या चार वर्षांपासून या भागात सक्रिय होता. २५ एप्रिल रोजी बसंतगड परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला.

हे ही वाचा : 

राहुल गांधींनी माझा मोबाईल नंबर सार्वजनिक केला, मी तक्रार करेन!

‘नेपाळ मॉडेल भारतात लागू करायचंय का? तिथे तर राजघराणं पाडलं’

दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत अभाविपचा अध्यक्ष, डाव्या संघटनांचा सुपडा साफ

सॅम पित्रोदा म्हणतात- पाकिस्तान-बांगलादेशमध्ये नेहमी घरच्यासारखं वाटलं!

दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या काउंटर-इंटेलिजन्स युनिटने दहशतवादी गुन्ह्याच्या संदर्भात काश्मीर खोऱ्यातील सात जिल्ह्यांमध्ये – श्रीनगर, बारामुल्ला, अनंतनाग, कुपवाडा, हंडवाडा, पुलवामा आणि शोपियानमध्ये शोध घेतला. या कारवाई दरम्यान, पूंछ सेक्टरमध्ये सुरक्षा दलांनी २० चिनी हँडग्रेनेडसह मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला. शस्त्रास्त्रांचा साठा अलीकडेच आणण्यात आला होता आणि दहशतवादाशी संबंधित कारवायांसाठी ते अंतर्देशीय भागात हलवण्याची दहशतवाद्यांची योजना होती. वेळेवर मिळालेल्या माहितीमुळे हा कट उधळून लावण्यास मदत झाली.

Exit mobile version