देशभरातील अँड्राईड आणि IOS स्मार्टफोनमध्ये शनिवारी (२ मे) अचानक एकाचवेळी अलर्ट आला आणि सर्वांचे फोन अलार्म वाजल्यासारखे वाजू लागले. यामुळे सुरुवातीला अनेकजण घाबरले आणि हे नेमके काय असा प्रश्न पडला. मात्र, काहीवेळानंतर हा आपतकालीन मेसेज असल्याचे स्पष्ट झाले. भारताने आपल्या नागरिकांसाठी तात्काळ आपत्ती सूचना सेवेकरिता, स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करुन सेल ब्रॉडकास्ट सुरु केले आहे.
भारताने एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. शनिवारी देशव्यापी मोबाईल-आधारित आपत्ती संप्रेषण प्रणालीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या मोबाईलवर ‘अत्यंत गंभीर इशारा’ असा संदेश प्राप्त झाला. प्रत्यक्षात, स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट प्रणालीची देशभरात चाचणी सुरू आहे, जेणेकरून आपत्तीविषयक इशारे जलदगतीने नागरिकांपर्यंत पोहोचवता येतील. त्याच अनुषंगाने सरकारने शनिवारी हा चाचणी संदेश पाठवला.
नागरिकांना हा अलर्ट हिंदी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये पाठवण्यात आला होता. त्यात नमूद करण्यात आले होते, “भारताने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून सेल ब्रॉडकास्ट सेवा सुरू केली आहे, ज्यामुळे नागरिकांना आपत्तीची तत्काळ माहिती मिळू शकेल. सजग नागरिक, सुरक्षित राष्ट्र. हा संदेश मिळाल्यानंतर कोणतीही कारवाई करण्याची आवश्यकता नाही. हा एक चाचणी संदेश आहे.” ही मोबाईल-आधारित आपत्ती संप्रेषण प्रणाली भारत सरकारच्या संचार मंत्रालयाच्या दूरसंचार विभागाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA) यांच्या सहकार्याने विकसित केली आहे, जेणेकरून महत्त्वाची माहिती वेळेत नागरिकांपर्यंत पोहोचवता येईल.
संचार मंत्रालयाच्या माहितीनुसार, ही प्रणाली आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाने सुचवलेल्या कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) वर आधारित आहे. सध्या ती भारतातील सर्व ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कार्यरत असून, भौगोलिकदृष्ट्या निवडक भागातील मोबाईल वापरकर्त्यांना एसएमएसद्वारे आपत्ती आणि आपत्कालीन सूचना पाठवते. या प्रणालीचा वापर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणांनी मोठ्या प्रमाणावर केला असून, नैसर्गिक आपत्ती, हवामान इशारे आणि चक्रीवादळांच्या काळात १९ हून अधिक भारतीय भाषांमध्ये आतापर्यंत १३४ अब्जांपेक्षा जास्त एसएमएस अलर्ट पाठवले गेले आहेत. त्सुनामी, भूकंप, वीज पडणे तसेच गॅस गळती किंवा रासायनिक धोका यांसारख्या मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींमध्ये वेळेवर इशारे देण्यासाठी एसएमएससोबत सेल ब्रॉडकास्ट (CB) तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात आला आहे.
हे ही वाचा:
बारावीच्या निकालात कोकण विभाग अव्वल तर मुलींची बाजी!
कलिंगड प्रकरण: घरातून गोळा केलेल्या अन्नाच्या ११ नमुन्यांमध्ये विष नाही
जबलपूर दुर्घटना: बोट बुडायला लागल्यानंतर लाईफ-जॅकेटची शोधाधोध केली
जर्मनीतून ५,००० अमेरिकन सैनिकांना माघारी बोलावणार
सेल ब्रॉडकास्ट प्रणालीमध्ये विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील सर्व मोबाईल उपकरणांना एकाच वेळी अलर्ट पाठवले जातात, त्यामुळे जवळपास तत्काळ सूचना पोहोचवता येतात. दूरसंचार विभागाच्या प्रमुख संशोधन आणि विकास केंद्र ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलीमॅटिक्स’ (सी-डॉट) यांना या स्वदेशी सेल ब्रॉडकास्ट-आधारित सार्वजनिक आपत्कालीन अलर्ट प्रणालीच्या विकास आणि अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आली आहे.
