राज्यात परतीच्या पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये मोठी वित्तहानी झाली आहे. सर्वात जास्त फटका बळीराजाला बसला असून ६० लाख हेक्टरचं नुकसान अतिवृष्टीमुळे झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले होते त्यासाठी राज्य सरकारने २ हजार २१५ कोटी रूपये वितरित करणे सुरू केल्याची माहिती आहे. तसेच ज्या ज्या प्रकारचे नुकसान झाले आहे त्याबाबत सामुहिक धोरण तयार करून पुढच्या आठवड्यात मदतीची घोषणा करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. ही सर्व मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी त्यांच्या खात्यात मिळावी असा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली.
शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. जवळपास ६० लाख हेक्टरचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यात ऑगस्टपर्यंत जे नुकसान झाले त्यासाठी २ हजार २१५ कोटी रूपये राज्य सरकारने वितरीत करणे सुरू केले आहे. या मदतीसाठी सरकारने ई- केवायसीची अट रद्द केली असून यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यानंतर पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असून २-३ दिवसांत सगळ्या प्रकारची माहिती पोहचेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
काही ठिकाणी पाणी असल्याने योग्य आकडेवारी घेता येत नव्हती तिथे प्रशासनाला अधिकचा वेळ दिल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर शेतकऱ्यांना करावयाची मदत, जमीन खरडून गेलेली असेल त्याकरता मदत, विहिरींसाठी मदत, घरांची मदत असेल अशा वेगवेगळ्या नुकसानीबाबत सर्वसमावेशक धोरण आखून सरकार मदत करणार आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
तसेच सगळी मदत शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मिळाली पाहिजे असा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होते. परंतु धोरणात कुठेही ओला दुष्काळाचा उल्लेख नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र ज्या वेळी दुष्काळ पडतो तेव्हा ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती यावेळी लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला आहे.
हे ही वाचा :
अहिल्यानगर: ‘आय लव्ह मोहम्मद’ वाद, ३९ जणांना अटक, २०० जणांवर गुन्हा दाखल!
सेबीने फ्युचर अँड ऑप्शन्स ट्रेडिंगसाठी नियम कडक
तालिबानचा निर्णय: इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद!
अंधश्रद्धेतून मित्राची धारदार शस्त्राने हत्या
दरम्यान, दिल्लीतून पूर्ण मदत होणार असून त्यासाठी प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. परंतु, दिल्लीच्या मदतीची वाट न पाहता लागेल ती मदत राज्य सरकार देत आहे. त्याची भरपाई दिल्लीतून नंतर केली जाईल. केंद्राला एक प्रस्ताव पाठवता येतो, वारंवार पाठवता येत नाही. त्यामुळे संपूर्ण नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर एक प्रस्ताव पाठवला जाईल असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
