अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल!

पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार पलवाशा मोहम्मद झई खान यांची धमकी

अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल!

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाचे वातावरण आहे. हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले असून भारत मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.  हल्ल्यासंदर्भात अनेक पुरावे समोर आल्यानंतरही पाकिस्तान नेहमी प्रमाणे हात वर करत आहेत. विशेष म्हणजे, याउलट पाक सरकार आणि नेते भारतालाच धमकी देत आहेत.

याच मालिकेत बिलावल भुट्टो यांच्या पक्षाच्या एका महिला खासदाराने पाकिस्तानी संसदेत भारताविरुद्ध विष ओकले आहे. पाकिस्तानच्या विरोधी पक्ष पीपीपीच्या खासदार पलवाशा मोहम्मद झई खान यांनी पाक संसदेत सांगितले की, अयोध्येतील बाबरी मशिदीची पहिली वीट पाकिस्तानी सैन्य रचेल. याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया समोर येवू लागल्या आहेत.

पलवाशा मोहम्मद झई खान यांनी म्हटले की, ‘तो दिवस दूर नाही जेव्हा पिंडीचा एक सैनिक बाबरी मशिदीच्या पायाची पहिली वीट रचेल आणि पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर तिथे पहिली अजान देतील.’ आम्ही बांगड्या घातलेल्या नाहीत.

खासदार पलवाशा इथेच थांबल्या नाही, त्यांनी भारताला धमकी देखील दिली. त्या म्हणाल्या, ‘जर भारताने पाकिस्तानवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर दिल्लीच्या लाल किल्ल्याचे मैदान रक्ताने माखले जाईल.’ जर कोणी पाकिस्तानकडे वाईट नजर टाकली तर त्याचे डोळे काढले जातील. भारतीय सैन्य विभागले गेले आहे. कोणताही भारतीय शीख सैनिक पाकिस्तानविरुद्ध लढणार नाही कारण त्यांच्यासाठी ही गुरु नानक यांची भूमी आहे. दरम्यान, खासदार पलवाशा यांचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा संपूर्ण पाकिस्तान भारताकडून होणाऱ्या संभाव्य हल्ल्यामुळे घाबरला आहे. तसेच खासदार पलवाशा यांच्यापूर्वी पाकिस्तानच्या अनेक नेत्यांनी भारताविरुद्ध भडकाऊ विधाने आणि धमक्या दिल्या आहेत.

Exit mobile version