गेल्या चार दशकांहून अधिक काळ कला क्षेत्रात कार्यरत असलेले युनूस खिमानी यांची चित्रे पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे. सुप्रसिद्ध चित्रकार युनूस खिमानी यांचे “I Fear” हे विशेष कला प्रदर्शन लवकरच कला रसिकांच्या भेटीला येत आहे. “I Fear” चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार असून चित्रे पाहण्यासाठी मोठ्या संख्येने रसिकांनी हजर राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्त्या आणि उद्योजिका शीतल कारूळकर यांच्या शुभहस्ते ३० डिसेंबरला या चित्र प्रदर्शनाचे उदघाटन होणार आहे.
या प्रदर्शनातून मानवी मनातील भीती, अस्वस्थता, अंतर्गत संघर्ष आणि बदलत्या भावना यांचे प्रभावी कलात्मक सादरीकरण करण्यात आले आहे.
युनूस खिमानी यांच्या “I Fear” चित्रांचे प्रदर्शन मुंबईतील काला घोडा येथील जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये भरणार आहे. ३० डिसेंबर २०२५ ते ४ जानेवारी २०२६ या काळात सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळात रसिकांना चित्रे पाहता येणार आहेत.
हे ही वाचा:
निर्माता संतापला; अक्षय खन्ना झाला ‘अदृश्यम !’
भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनला
पुढील पाच वर्षांत ४८ स्टेशन्सची क्षमता दुपटीने होणार
युनूस खिमानी हे गेल्या ४० वर्षांहून अधिक काळ कलाक्षेत्रात कार्यरत असलेले एक स्वतंत्र कलाकार आहेत. पूर्वी अनेक माध्यमांमध्ये काम केल्यानंतर, अलीकडे टाकाऊ प्लास्टिकने त्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याबद्दलची उत्सुकता त्यांना आकर्षित करत आहे, ज्यामुळे ते त्याचे कलेत रूपांतर करण्याच्या प्रयोगांमध्ये व्यस्त आहेत. युनूस खिमानी हे प्रयोगशील कलाकार म्हणून ओळखले जातात. त्यांच्या कलेतून विचारप्रवर्तक विषय, भावनिक खोली आणि आधुनिक दृष्टिकोन जाणवतो. त्यांच्या कामाची शैली नेहमी प्रयोगशील राहिली आहे आणि ते नेहमी नवीन माध्यमांचा शोध घेतात. “I Fear” हे प्रदर्शन समकालीन कलेचा अनुभव देणारे आणि मनाला भिडणारे आहे. कला रसिक, विद्यार्थी आणि अभ्यासकांसाठी हे प्रदर्शन नक्कीच एक वेगळा अनुभव ठरणार आहे.
- स्थळ- जहांगीर आर्ट गॅलरी, काला घोडा, मुंबई
- दिनांक- ३० डिसेंबर ते ४ जानेवारी
- वेळ- सकाळी ११ ते सायंकाळी ७
