‘हिंदू दहशतवाद’, शरद पवारांसारख्या कटवाल्यांचा बाजार उठवणारा हा निकाल!

भाजपा आमदार अतुल भातखळकर यांची प्रतिक्रिया 

‘हिंदू दहशतवाद’, शरद पवारांसारख्या कटवाल्यांचा बाजार उठवणारा हा निकाल!

१७ वर्षे जुन्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात गुरुवारी (३१ जुलै) एनआयए न्यायालयाने साध्वी प्रज्ञा ठाकूरसह सर्व सात आरोपींना निर्दोष मुक्त केले. ‘आरोपींविरुद्ध ठोस पुरावे नाहीत, संशयाच्या आधारे दोषी ठरवता येत नाही,’ असे न्यायालयाने नमूद केले. दरम्यान, न्यायालयाच्या निकालानंतर राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहे. याच दरम्यान, भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीटकरत प्रतिक्रिया दिली.

भातखळकर ट्वीटकरत म्हणाले, विशेष न्यायालयाने २००८ च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील सगळ्या आरोपींची आज निर्दोष सुटका केलेली आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ‘हिंदू दहशतवाद’ नावाचा जो कट शिजवण्याचा प्रयत्न सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली झाला, महाराष्ट्रात ज्याचे प्रतिनिधित्व आदरणीय शरद पवार करत होते त्या कटवाल्यांचा बाजार उठवणारा हा निकाल आहे.

सबळ पुरावे नसल्याने न्यायालयाने भाजपच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहितसह रमेश उपाध्याय, सुधाकर चतुर्वेदी, अजय राहिरकर, सुधाकर धर द्विवेदी उर्फ शंकराचार्य आणि समीर कुलकर्णी या सर्वांची निर्दोष मुक्तता केली.

दरम्यान, एनआयए न्यायालयाच्या निर्णयानंतर उमा भारती म्हणाल्या, ज्या काँग्रेस नेत्यांनी याला भगवा दहशतवाद म्हटले आहे त्यांनी माफी मागावी. हिंदूंना बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. साध्वी प्रज्ञा आणि इतर आरोपींना निर्दोष सोडण्यात आल्याने मला दिलासा मिळाला आहे.

Exit mobile version