ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले, पाकचे ३५-४० सैनिक मृत्यूमुखी, पाकची जेटही पाडली!

भारतीय सेनादलांच्या डीजीएमओची पत्रकार परिषदेत माहिती

ऑपरेशन सिंदूरमध्ये १०० दहशतवादी मारले, पाकचे ३५-४० सैनिक मृत्यूमुखी, पाकची जेटही पाडली!

भारतीय लष्कराने रविवारी (११ मे) पुष्टी केली की १९९९ च्या इंडियन एअरलाइन्सच्या विमानाचे (IC-८१४) अपहरण आणि २०१९ च्या पुलवामा हल्ल्यात सहभागी असलेले अनेक उच्च दर्जाचे पाकिस्तानी दहशतवादी ठार झालेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले आहेत. आज (११ मे) तीनही दलाच्या डीजीएमओ यांची संयुक्त पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत आतापर्यंत पाकिस्त्नान विरुद्ध केलेल्या कारवाईची अधिकाऱ्यांनी माहिती दिली. लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई, हवाई दलाचे डीजीएमओ एअर मार्शल अवधेश कुमार भारती आणि भारतीय नौदलाचे व्हाइस अ‍ॅडमिरल एएन प्रमोद पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

“त्या नऊ दहशतवादी केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमध्ये १०० हून अधिक दहशतवादी ठार झाले, ज्यात युसूफ अझहर, अब्दुल मलिक रौफ आणि मुदासिर अहमद सारखे उच्च दर्जाचे दहशतवादी मारले गेले, जे ‘IC-८१४’ च्या अपहरणात आणि पुलवामा बॉम्बस्फोटात सहभागी होते,” असे एअर मार्शल एके भारती यांनी लष्कराच्या पत्रकार परिषदेत सांगितले.

जैश-ए-मोहम्मद (जेईएम) चा प्रमुख मौलाना मसूद अझहरचा भाऊ युसूफ अझहर हा आयसी-८१४ अपहरण प्रकरणात हवा होता, ज्यामुळे १९९९ मध्ये मसूद अझहरची सुटका झाली. त्याने दहशतवादी गटाच्या कारवायांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, शस्त्रास्त्र प्रशिक्षणावर देखरेख केली आणि जम्मू आणि काश्मीरमधील अनेक दहशतवादी हल्ल्यांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.

अब्दुल मलिक रौफ हा लष्कर-ए-तैयबा (एलईटी) या दहशतवादी संघटनेचा उच्चपदस्थ कमांडर होता आणि अमेरिकेने त्याला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मुदसीर अहमद हा लष्करचा एक वरिष्ठ कार्यकर्ता होता आणि दहशतवादी संघटनेचे मुख्यालय मुरीदके येथील मरकज तैयबाचा प्रभारी होता.

हे ही वाचा : 

भारताविरुद्ध पाकला ड्रोन पुरविणाऱ्या तुर्कीचे सफरचंद आम्हाला नको!

पंतप्रधान मोदींनी ठणकावले; आता पाकिस्तानशी चर्चा फक्त पाकव्याप्त काश्मीरवरच!

मला अभिमान आहे, वडिलांच्या मृत्यूचा बदला घेईन!

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा दिमाखात उभा! 

“दहशतवादाचे गुन्हेगार आणि योजना आखणाऱ्यांना शिक्षा करणे आणि त्यांच्या दहशतवादी पायाभूत सुविधा नष्ट करणे, हे लष्कराचे मुख्य उद्दिष्ट होते. त्यानुसार ‘ऑपरेशन सिंदूर’ची संकल्पना मांडण्यात आली होती, असे उच्च लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.

डीजीएमओ पातळीवर युद्धबंदीचा करार होऊनही गोळीबार सुरूच राहिल्याने शेजारच्या देशाच्या सैन्याचे नापाक हेतू स्पष्ट झाल्याचे अधिकार्यांनी सांगितले. भारतीय लष्कराचे डीजीएमओ लेफ्टनंट जनरल राजीव घई यांनी स्पष्ट केले आहे की जर पाकिस्तानने आज असे काही करण्याचे धाडस केले तर भारतीय लष्कर त्याला योग्य उत्तर देईल. ते म्हणाले की, दुर्दैवाने पाकिस्तानी गोळीबारात पाच भारतीय लष्करी जवानांनाही आपले प्राण गमवावे लागले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, भारताच्या कारवाईत ३५-४० सैनिक मारले गेले.

डीजीएमओ राजीव घई म्हणाले, काल पाकिस्ताननेच युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला. त्यांनी दुपारी ३.३५ वाजता फोन करून युद्धबंदीबद्दल बोलले. संध्याकाळी ५ वाजता युद्धबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि काही तासांतच त्यांचे ड्रोन भारतीय सीमेत घुसू लागले. जर आज (११ मे) रात्री पाकिस्तानने पुन्हा युद्धबंदीचे उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला तर त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल.

हवाई दलाचे डीजीएमओ एअर मार्शल अवधेश कुमार भारती यांनी सांगितले की, कारवाई दरम्यान भारताने अनेक हायटेक पाकिस्तानी विमाने पाडली आहेत. “त्यांच्या विमानांना आमच्या सीमेत प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले.  निश्चितच, आम्ही काही विमाने पाडली आहेत, असे एअर मार्शल ए.के. भारती म्हणाले.

दरम्यान, पूर्वीच्या अहवालांमध्ये असे सुचवण्यात आले होते की भारताने इतर प्रोजेक्टाइल आणि क्षेपणास्त्रे रोखण्याव्यतिरिक्त एक पाकिस्तानी ‘F-१६’ आणि कदाचित दोन ‘JF-१७’ लढाऊ विमाने पाडली आहेत. पाकिस्तानचे एअरबोर्न वॉर्निंग अँड कंट्रोल सिस्टम (AWACS) विमान देखील भारतीय सैन्याने पाडल्याचे वृत्त आहे. तथापि, अधिकाऱ्याने कोणत्या प्रकारची विमाने नष्ट केली हे स्पष्ट केले नाही.

Exit mobile version